नांदेडच्या ‘या’ धाब्यावर पोलिसांची कारवाई 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 21 एप्रिल 2020

 ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अंबाई धाबा येथे सोमवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास केली. 

नांदेड : मनाठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाउनच्या काळात बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारु काळ्या बाजारात विनापरवाना विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अंबाई धाबा येथे सोमवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास केली. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरासह नांदेडमध्येही लॉकडाउन सुरू आहे. या काळात अत्यावश्‍यक सेवेतील लोकांनीच घराबाहेर पडण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र काही नागरिक या कायद्याचे उल्लंघन करुन बिनदिक्कतपणे अवैध धंदे करत आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आपल्या यंत्रणेला दिल्या आहेत. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. 

हेही वाचालॉकडाउन : न्यायदानासोबतच ‘याही’ कामात उडी

अंबाई धाब्यावर दारु विक्री होतांना कारवाई

सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी आपले सहकारी कर्मचारी रवी बाबर, बालाजी यादगीरवाड, श्री. तेलंग, बालाजी हिंगणकर आणि श्री. शिंदेसह फरार व पाहिजे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासकिय वाहन (एमएच२६-आर-०४८२) घेऊन नांदेड शहर, ग्रामिण उपविभागात गस्त घालण्यासाठी सोमवारी (ता. २०) दुपारी रवाना झाले. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मनाठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबाई धाब्यावर दारु विक्री होत होती. 

धाबा मालकासह वेटरला अटक

स्थागुशाच्या पथकानी या ठिकाणी कारवाई करुन धाबा मालक माधव रामराव गुरुपवार आणि रुख्माजी गंगाधर उपलंचवार यांना ताब्यात घेतले. धाबा परिसरात पाहणी केली असता पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या कोरड्या चेंबरमध्ये देशी व विदेशी दारुचे बॉक्स आढळून आले. यात ३७ हजार ४४० रुपयाची देशी दारु, सहा हजार ७२० रुपयाची विदेशी दारु आणि १८ हजार ५९० रुपये असा ६२ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

येथे क्लिक करा -  आधीच ‘कोरोना’, त्यात अवकाळीने दैना !

मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सोबत घेऊन मनाठा पोलिस ठाणे गाठले. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या फिर्यादीवरुन माधव गुरुपवार आणि रुख्माजी उपलंचवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action against this dhaba Nanded