‘एटीएम’ जळीतप्रकरणी ‘त्या’ दोघांना जेलची हवा !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

- आग लावल्याचा व्हिडीओ ‘सीसीटीव्ही’तून आला समोर

परभणी : भारतीय स्टेट बँकेचे ‘एटीएम’ जाळणाऱ्या दोन आरोपींना नवा मोंढा पोलिसांनी शुक्रवारी (ता. सहा) पहाटे बोरी (ता. जिंतूर) येथून ताब्यात घेतले. या दोघांनाही न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

परभणी शहरातील नेहरू रोडवर असलेले भारतीय स्टेट बँक शाखेचे ‘एटीएम’ सेंटर बुधवारी (ता. चार) जळाले होते. सुरवातीला शॉर्ट सर्किटने आग लागली असावी, असा अंदाज बांधला जात होता. यामुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान, बँकेच्या एटीएममध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची तपासणी गुरुवारी (ता. पाच) पोलिसांनी केली. यात एक व्यक्ती एटीएम मशीनवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिल्याचे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोन संशयीतांना शुक्रवारी (ता. सहा) पहाटे बोरी (ता. जिंतूर) येथून ताब्यात घेतले. यात नंदकुमार गोपाळराव पुरी व गोविंद रामेश्वर अंभोरे (दोघेही रा. संजयनगर, बोरी, ता. जिंतूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पैशाची नोंद होत नसल्याने केला प्रकार
पाच दिवसांपूर्वी गोविंद रामेश्वर अंभोरे यांचे पैसे घेऊन नंदकुमार गोपाळ पुरी हा बँकेत गेला होता. त्याने जमा केलेल्या पैशाची नोंद होत नसल्याने तो वैतागला होता, त्याने याची तक्रार बँकेकडे केली होती. परंतु, बँकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नंदकुमार गोपाळ पुरी याने हा प्रकार केल्याची माहिती नवामोंढा पोलिसांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrest both men for setting up an ATM fire