esakal | उपजिल्हाधिकारी नरहरी शेळकेला अटक, गुन्हे शाखेची कारवाई | Deputy Collector Narhari Shelke
sakal

बोलून बातमी शोधा

Narhari Shelke
उपजिल्हाधिकारी नरहरी शेळकेला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

उपजिल्हाधिकारी नरहरी शेळकेला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाची जमीन भलत्यांच्याच नावे करण्यात आल्याच्या प्रकरणात जमीन खालसाचे आदेश देणारा तत्कालीन भूसुधार उपजिल्हाधिकारी आणि सध्या बडतर्फ करण्यात आलेल्या डॉ. नरहरी शेळकेला (Deputy Collector Narhari Shelke) अखेर शनिवारी (ता. नऊ) अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला औरंगाबाद येथून अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपीसमोर आले असून आणखी एक उपजिल्हाधिकारी देखील (Beed) पोलिसांच्या रडारवर आहे. आष्टी तालुक्यातील देवस्थान जमीन घोटाळ्यात आरोपींची अटक होत नसल्याची तक्रार आमदार बाळासाहेब आजबे (MLA Balasaheb Ajabe) यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे केल्यानंतर आता या प्रकरणात ही कारवाई सुरु झाली आहे.

हेही वाचा: धक्कादायक ! मराठवाड्यात वीज पडून पाच जणांचा मृत्यू, दोघे गंभीर

आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाची जमीन मदतमास दाखवून खालसा करीत भलत्यांच्याच नावे करण्यात आली होती. सुमारे ५६ एकर जमिनीच्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण समोर आल्यानंतर वक्फ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात जुलै महिन्यात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरुवातीला केवळ दोन आरोपी होते. नंतर मात्र तपासा दरम्यान आरोपींची संख्या वाढली आणि महसूल अधिकारी देखील आरोपी म्हणून समोर आले. या प्रकरणात उपजिल्हाधिकारी पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉ. नरहरी शेळके याला शनिवारी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. डॉ. एन आर शेळके बीड येथे भूसुधार उपजिल्हाधिकारी असताना त्याच्याच स्वाक्षरीने सदर जमिनींचे खालसा आदेश झाल्याचे समोर आले असून कोणत्याही संचिकेशिवाय बोगसपणे हे आदेश काढल्याचे समोर आले आहे.

जामिनावरील सुनावणीपूर्वीच अटक

डॉ. एन. आर. शेळकेचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतली होती. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच शेळकेला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. शेळकेंच्या रूपाने एक मोठा मासा पोलिसांच्या हाती लागला आहे.

हेही वाचा: महंगाई डायन खाए जात है! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

१५ आरोपी आणखी एक उपजिल्हाधिकारी

चिंचपूर येथील मस्जिद व दर्गा गैबीपीर या देवस्थानची बेकायदा हस्तांतरण प्रकरणी जिल्हा वक्फ अधिकारी अमिनू जमा खिलीखु जमा यांनी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुरुवातीला इर्शान नवाब खान व असलम नवाब खान (रा.आझादनगर, आष्टी ) यांच्या विरोधात गुन्हे नोंद झाले. आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांच्याकडे तपास आहे. तपासात रहेमान उर्फ रहीम हुसेन शेख, रज्जाक हुसेन शेख, बहादुरखा अब्बासखा पठाण, शेरखा अब्बासखा पठाण, एकबाल अहमदखान, अय्यूबखान अहमदखान पठाण, रूखसान सय्यद सुलतान (रा.जामखेड), झाकीर बहादूरखान पठाण, जमीर बहादुरखान पठाण, अस्लम शेरखा पठाण, परवीन जमिरखान पठाण (रा.चिंचपूर ता.आष्टी), प्रकाश आघाव पाटील (तत्कालिन उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन), डॉ. एन. आर. शेळके (तत्कालिन भूसधार उपजिल्हाधिकारी) (रा.बीड) यांची नावे समोर येऊन आरोपींची संख्या १५ झाली. यात एक बडतर्फ तर एक तत्कालिन उपजिल्हाधिकाऱ्याचा समावेश आहे. बडतर्फ असलेल्या डॉ. शेळकेला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकाश आघाव पाटीलचेही नाव आरोपीमध्ये आहे.

loading image
go to top