चारवेळा पळून गेलेला चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

 लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत घरफोड्या केलेल्या, चाकूचा धाक दाखवून सोने-पैसे लुटणाऱ्या आणि पोलिसांच्या ताब्यातून चारवेळा पळून गेलेल्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूर जिल्ह्यातील तांबेवाडी-नातेपुते भागातून ताब्यात घेतले. हसन जमीर शेख उर्फ समीर बाबू शेख उर्फ मुक्तार (रा. नळेगाव, ता. चाकूर) असे चोराचे नाव आहे. त्यास मंगळवारी (ता. सहा) शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. 

लातूर : लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत घरफोड्या केलेल्या, चाकूचा धाक दाखवून सोने-पैसे लुटणाऱ्या आणि पोलिसांच्या ताब्यातून चारवेळा पळून गेलेल्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूर जिल्ह्यातील तांबेवाडी-नातेपुते भागातून ताब्यात घेतले. हसन जमीर शेख उर्फ समीर बाबू शेख उर्फ मुक्तार (रा. नळेगाव, ता. चाकूर) असे चोराचे नाव आहे. त्यास मंगळवारी (ता. सहा) शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. 

घरफोड्या, चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी वेगवेगळी पथके स्थापन केली आहेत. यापैकीच एका पथकाला पोलिसांच्या ताब्यातून चारवेळा पळून गेलेल्या हसन जमीर शेख याची माहिती समजली. तो तांबेवाडी-नातेपुते येथे राहत असल्याची खात्रीशिर माहिती समजल्यानंतर पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाले. या पथकाने मंगळवारी पहाटे शेखला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे शेख हा तेथे नाव बदलून राहत होता. हसन जमीर शेख ऐवजी तो आपले नाव समीर बाबू शेख उर्फ मुक्तार असे सांगायचा. 

चाकूर तालुक्‍यातील दापकाळ येथे राहणारे जावेद शेख आणि त्यांच्या पत्नीला बुकनवाडी पाटीजवळ अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम, दागिने आणि दुचाकी असा 73 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची हसन शेख याने कबुली दिली आहे. ही चोरी 29 एप्रिल रोजी केली होती.

या गुन्ह्यातील दुचाकी आरोपीकडून पोलिसांनी जप्त केली आहे. तर, इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना 2018 मध्ये लातूर जिल्हा कारागृहातून हसन शेख यास जिल्हा न्यायालयात आणले असता तो पोलिसांची नजर चुकवून तिथून पळून गेला होता. याशिवाय, लातूर शहर आणि जिल्ह्यातील 20 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यादृष्टीनेही त्याची चौकशी केली जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सहायक पोलिस निरिक्षक सुधीर सूर्यवंशी, अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले, खुर्रम काझी, प्रकाश भोसले, सचिन मुंडे यांचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police caught thief