कोरोना संशयित पोलिसाची लावली ड्युटी, रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, दुचाकीने गाठले रुग्णालय

प्रा. प्रवीण फुटके
Monday, 27 July 2020

बीड जिल्ह्यातील प्रकार

परळी (जि. बीड) -  येथील शहर पोलिस ठाण्यातील एक ४२ वर्षीय पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे शनिवारी रात्री आलेल्या अहवालातून निष्पन्न झाले. हा कर्मचारी जोडवाडी चेकपोस्टवर कर्तव्यावर होता; मात्र पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही या कर्मचाऱ्याला रविवारी (ता. २६) सकाळपर्यंत ड्युटी करावी लागली. एवढेच नाही, तर ड्युटीवरून
आल्यानंतर रुग्णवाहिकेअभावी सकाळी दुचाकीवरून त्यांना रुग्णालय गाठावे लागले. 

बाधित पोलिस कर्मचारी कर्मचारी बीड-लातूर सीमेवरील जोडवाडी चेकपोस्टवर कर्तव्यास होता. शुक्रवारी (ता. २४) त्यांचा ‌‌स्वॅब‌ घेण्यात आला होता. स्वॅब घेतल्यानंतरही शनिवारी ड्युटी देण्यात आली. शनिवारी दिवसभर या कर्मचाऱ्याने अन्य दोन सहकारी आणि एका पोलिस अधिकाऱ्यासोबत जोडवाडी चेकपोस्टवर ड्युटी केली. रात्री उशिरा त्यास अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यास तातडीने कोविड कक्षात दाखल करणे गरजेचे होते; तरीसुद्धा रुग्णवाहिका पाठविण्यात आली नाही. पॉझिटिव्ह असतानाही रात्रभर त्या कर्मचाऱ्याने इतरांना लागण होणार नाही, याची काळजी घेत कर्तव्य बजाविले. सकाळी साडेसात वाजता सुटी झाल्यानंतर दुचाकीने रुग्णालयात दाखल झाला. वाटेत त्याला काही त्रास होऊ नये म्हणून त्याचे तीन सहकारी त्याच्या दुचाकीच्या मागे वाहन घेऊन गेले होते, अशी माहिती आहे. 

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे चालूच आहे. स्वॅब घेतल्यानंतर क्वारंटाइन राहण्यास सांगितले जाते. हा कर्मचारी का राहिला नाही. त्याने त्यानंतरही ड्युटी केली का? हे पोलिसच सांगू शकतील. उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका खराब असल्याने सिरसाळा येथील मागविण्यात आली. त्यामुळे उशीर झाला. 
- डॉ. लक्ष्मण मोरे, तालुका आरोग्य अधिकारी 

पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याची माहिती रात्री उशिरा मला कळाली होती. स्वॅब‌ घेतल्यानंतरही ड्युटी कशी काय देण्यात आली, याबाबत चौकशी करण्यात येईल. 
- राहुल धस, उपविभागीय पोलिस अधिकारी. 

 

(संपादन : विकास देशमुख)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Constable Affected By CORONA