
अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार धोक्यात आले. आमदनीला ब्रेक लागला. सतत घरात राहिल्याने चिडचिड वाढली. कौटुंबिक वाद सुरू झाले. अनेकांना ताणतणाव, अकारण चिंता, भावनिक अस्थिरता यासह उदासीनतेमुळे मानसिक आजार बळावले आहेत. परिणामी, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अर्थात, हेही दिवस निघून जातील, फार ताण घेऊ नका, असा सल्लाही मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक देत आहेत.
जालना - साडेतीन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाउन व संचारबंदी लागू झाली. अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार धोक्यात आले. आमदनीला ब्रेक लागला. सतत घरात राहिल्याने चिडचिड वाढली. कौटुंबिक वाद सुरू झाले. अनेकांना ताणतणाव, अकारण चिंता, भावनिक अस्थिरता यासह उदासीनतेमुळे मानसिक आजार बळावले आहेत. परिणामी, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अर्थात, हेही दिवस निघून जातील, फार ताण घेऊ नका, असा सल्लाही मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक देत आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वच स्तरांवर खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे चार महिने सारखे घरातच राहावे लागत असल्याने अनेक मानसिक आजारांची लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.
हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...
नागरिकांची मानसिकता, एखाद्याची नोकरी जाणे, अपुरे वेतन मिळणे, आता कसे होईल या अकारण मानसिक भीतीने नागरिकांत भावनिक अस्वस्थतेचे प्रमाण वाढले आहे. सारखे घरातच असल्याने काय करावे? असे प्रश्न भेडसावत आहेत. सामाजिकीकरणाची प्रक्रिया कमी होत असल्याने एकटेपणा वाढला आहे. सारखे मोबाईलवर बोलणार किती, टीव्ही किती पाहणार असे चित्र आहे.
हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल
बाहेरील विरंगुळा व करमणुकीची साधने जसे चित्रपटगृह, नाट्यगृह, उद्यान बंद आहेत. बाहेर फिरणे बंद आहे. धार्मिक स्थळांची दारेही उघडलेली नाहीत, तसेच पर्यटनही नाही. अशा विविध कारणांनी आणि बाहेरील वातावरणाने तसेच वाढती रुग्णसंख्या आणि प्रमाण यामुळे सामान्य नागरिक अस्वस्थ झाला आहे. खासगी क्षेत्रात अनेकांची नोकरी धोक्यात आली आहे. कामगार कपात होणे, अपुरे वेतन मिळणे किंवा वेतनच न मिळणे, भविष्याची चिंता अशा अनेक कारणांची अधिक भर पडत आहे. परिणामी, मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे मानसशास्त्र अभ्यासकांचे मत आहे.
अकारण घबराट होणे, बेचैनी, आपल्याला काही आजार तर नाही ना, अशी धारणा बनणे, व्यसनाधीनता अशी कारणे सांगत मानसोपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत दोन महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील मंठा चौफुली परिसरातील मानस हॉस्पिटलमध्ये दररोज तपासणीस येणाऱ्या रुग्णांत मोठी वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ झाली असून अशा रुग्णांची संख्याही जास्त असल्याचे अनुभव डॉक्टरांनी सांगितले आहेत. अशा वातावरणाचा दूरगामी परिणाम दिसून येणार असून अशा रुग्णसंख्येत अधिक वाढ होण्याची भीती मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मानसिक आरोग्याबाबतच्या तक्रारी घेऊन येणारी रुग्णसंख्या अधिक आहे. अकारण भीती, असुरक्षिततेची भावना यासह अनेक मानसिक आजारांची लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
- डॉ. प्रकाश आंबेकर
मानसोपचार तज्ज्ञ
(संपादन : संजय कुलकर्णी)