
केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्यातील लाचखोरीची घटना प्रकार अखेर समोर आली आहे.
केज (जि.बीड) : केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्यातील लाचखोरीची घटना प्रकार अखेर समोर आली आहे. ठाण्यातील पोलिस शिपायासह अन्य एकास लाच स्वीकारताना बुधवारी (ता.नऊ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पकडण्यात आलेल्यात पोलिस शिपाई लक्ष्मीकांत काशीराम पवार (वय ५२) व सेवानिवृत्त होमगार्ड शेषेराव वैरागे (वय ५८) अशी नावे आहेत.
या प्रकरणातील पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडून जामीन मांडण्यासाठी अठरा हजारांची लाच मागितली होती. त्यातील तडजोडीपोटी ठरलेले नऊ हजार रुपये घेताना युसूफवडगाव ठाण्याच्या आवारात रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड पथकाने पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. आरोपी विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
संपादन - गणेश पिटेकर