esakal | फेसबुकवरील मैत्री पडली महागात, महिलेच्या जाचामुळे तरुणाने केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Sangale.

सोशल मीडियाचा वापर वाढण्यास त्यावरुन मैत्री आणि विविध माध्यमांतून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. असेच, एका तरुणालाही फेसबुकवरील मैत्री महागात पडून त्याला जीव गमवावा लागला आहे.

फेसबुकवरील मैत्री पडली महागात, महिलेच्या जाचामुळे तरुणाने केली आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : सोशल मीडियाचा वापर वाढण्यास त्यावरुन मैत्री आणि विविध माध्यमांतून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. असेच, एका तरुणालाही फेसबुकवरील मैत्री महागात पडून त्याला जीव गमवावा लागला आहे. धारुर तालुक्यातील कासारी फाटा येथील २५ वर्षीय तरुण दीपक सुभाष सांगळे याची फेसबुकवरुन एका महिलेशी मैत्री झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर महिलेने तरुणाला लग्नासाठी गळ घालत जमीन व ट्रक नावावर करण्यासाठी तगादा लावला. या जाचास वैतागून तरुणाने शुक्रवारी (ता.चार) धारुरजवळीत एका शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. पाच) ही घटना समोर आली. या प्रकरणी सोमवारी (ता. सात) संबंधित महिलेसह या तरुणाच्या मित्रावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा धारुर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.


दीपक सांगळे हा अविवाहित होता. स्वत:च्या मालकीचा ट्रक चालवून तो कुटुंबाला हातभार लावत असे. त्याची विवाहित बहीण शीतल दिगांबर घुगे (रा. चिंचपूर ता.धारुर) यांनी सोमवारी धारुर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मयत दीपक याची आरती (पूर्ण नाव माहीत नाही) या पुणेस्थित विवाहित महिलेशी फेसबुवर सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरतीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर माझ्याशी लग्न कर,शेती व ट्रक नावची कर' असे म्हणून तिने त्यास मानसिक त्रास दिला.

तिच्या सततच्या त्रासास कंटाळून दीपकने आत्महत्येचे पाऊल उचलले. आरतीला मृत दीपकचा मोबाइल क्रमांक उपलब्ध करुन दिल्याने त्याचा मित्र ज्ञानेश्वर उर्फ वाघ्या बाबासाहेब मुर्गीकर (रा. धारुर) यालाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले. या प्रकरणात आरोपी महिलेच्या पूर्ण नावाचा उल्लेख नाही. तिची ओळख पटविण्यासाठी मयत दीपक सांगळे व त्याचा मित्र ज्ञानेश्वर मुर्गीकर या दोघांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत. त्यावरुन आरोपी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून अधिक तपास सुरु असल्याचे तपासी अधिकारी फौजदार प्रदीप डोलारे यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

loading image