दारू कारखान्यावर छापे

कृष्णा पिंगळे
Sunday, 19 April 2020

सोनपेठ (जि.परभणी) पोलिसांनी या अवैध दारू कारखान्यावर छापे टाकून शेकडो लिटर हातभट्टी दारूचा जागेवरच नाश करून कारवाई करण्यात येत आहे.

सोनपेठ (जि.परभणी) : कोरोना या संसर्गजन्य महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असताना ग्रामीण भागात मात्र, या संचारबंदीचा फायदा घेऊन काही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू बनविण्याचे काम जोरात सुरू होते. परंतु, गुप्त माहितीच्या आधारे सोनपेठ पोलिसांनी या अवैध दारू कारखान्यावर छापे टाकून शेकडो लिटर हातभट्टी दारूचा जागेवरच नाश करून कारवाई करण्यात येत आहे.
सोनपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या कारखान्यांवर सोनपेठ पोलिसांचे धाडसत्र सुरूच असून ता.१८ रोजी सोनपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, पोलिस महेश कवठाळे, पांडुरंग काळे तसेच अनिल कांबळे यांचे एक पथक तालुक्यात गस्त घालत होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीनुसार उखळी तांडा येथे सखाराम राठोड व सगुणा राठोड हे आपल्या घरात अवैध हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने सखाराम राठोड याच्या घरी छापा टाकून त्याच्या घरातून दोन लोखंडी टाक्यांमध्ये ठेवलेले तब्बल ४२० लिटर रसायन ज्याची अंदाजे किंमत ९८०० रुपये तसेच एका पांढऱ्या बकेट मध्ये गावठी हातभट्टी दारू २० लिटर ज्याची अंदाजे किंमत एक हजार रुपये ताब्यात घेतली. या वेळी सखाराम राठोड व सगुणा राठोड हे दोघेही घराच्या पाठीमागील दरवाजाने पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त केलेली अवैध हातभट्टी दारू ही जागेवरच नाश करण्यात आली. तसेच उखळी तांडा येथेच मारोती पंडित राठोड तसेच राजू मारोती राठोड हे आपल्या घरात अवैध हातभट्टी दारू तयार करून विक्री करत असल्याच्या माहितीवरून संबधित पोलिसांच्या पथकाने त्यांच्या घरी छापा टाकून तब्बल ६६० लिटर दारू बनविण्याचे रसायन तसेच २० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. (ज्याची अंदाजे किंमत १३,९५० रुपये) जप्त करण्यात आलेले रसायन तसेच हातभट्टी दारूचा नाश जागेवरच करण्यात येऊन चारही आरोपींविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - आमदार बोर्डीकर यांच्यातर्फे मदत

अवैध हातभट्टी दारू विक्रीने धाबे दणाणले
यामुळे सोनपेठ तालुक्यातील अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून सोनपेठ पोलिसांनी राबवलेल्या या धाड सत्राचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police get drunk at the factory,parbhani news