आमदार बोर्डीकर यांच्यातर्फे मदत

राजाभाऊ नगरकर
Sunday, 19 April 2020

चार हजारांवर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

जिंतूर (जि.परभणी) : लाॅकडाउनमुळे जिंतूर-सेलू मतदारसंघातील कोणी उपाशी राहू नये याची काळजी घेत आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर स्थानिकांसह परराज्यातील अडकलेल्या कुटुंबांना कार्यकर्त्यांमार्फत मदत पोचविण्याचे काम करीत आहेत. चार हजारांवर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. मागणीनुसार हा मदतीचा महायज्ञ सुरूच आहे.
कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित केले. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. जिल्हा बंदीमुळे स्थलांतरीत मजूर राज्यात व ठिकठिकाणी अडकले. जवळ पैसे नाहीत, त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्र्न निर्माण झाल्याने आमदार मेघना बोर्डीकर यांनी गरजूंना मदत पोचविण्यासाठी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांची फळी कामाला लावली. प्रसंगी प्रशासनामार्फतही मदत पोचविली जात आहे.

हेही वाचा - कोरोना : गावच्या वेशितच ग्रामसुरक्षादलाचा पहारा

सेलू येथे कम्युनिटी किचन
सुरवातीला आमदार बोर्डीकर यांनी जिंतूर आणि सेलू येथे कार्यकर्ते, नागरिक व अधिकारी वर्गाच्या भेटी घेऊन आढावा घेतला. त्यानंतर लॉकडाउनमध्ये गरजूंची अडचण होऊ नये यासाठी सेलू येथे कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले. याद्वारे गरजेनुसार रोज ६० ते १०० जेवणाचे डबे पुरविले जात आहेत. तर दोन्ही शहरांतील (जिंतूर, सेलू) जवळपास ३०० कुटुंबांना धान्याची मदत करण्यात आली, ती सध्याही सुरूच आहे.
 
अडकलेल्या कामगारांना मदत
लॉकडाउनचा सर्वाधिक फटका जिंतूर व सेलू या दोन्ही तालुक्यांतील स्थलांतरीत कामगार वर्गाला बसला असल्याने त्यांना धान्य पुरवठा, जेवणाची पाकिटे याची व्यवस्था करून तातडीने मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. यात प्रामुख्याने मुंबई, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, नाशिक या व इतर जिल्ह्यांत ठिकठिकाणी अडकलेल्या कामगार, मजूरदार कुटुंबांना विविध माध्यमांमार्फत थेट मदत पोचविण्यात आली.

हेही वाचा - माहूर गडावर भक्ताविना दैनंदीन पुजाअर्चा

राज्याबाहेरील स्थलांतरीतांना मदत
हैद्राबाद, तेलंगाना, सुरत, गुजरात या राज्यात अडकलेल्या जिंतूर, सेलू तालुक्यातील नागरिकांनाही मदत पोचविण्याचे कार्य सुरू आहे. मदतीचा हा महायज्ञ सुरूच राहणार असून काही कारणास्तव अनेकदा मदत पोचविण्यास थोडा विलंब होत आहे. तरी, नागरिकांनी संयम बाळगून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार बोर्डीकर यांनी केले आहे.

 

 मदतीचा हात पुढे
मदत कार्यात प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था, त्या त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच साकोरे आणि बोर्डीकर परिवाराचे हितचिंतक, मित्र परिवार यांचे मोठे योगदान आहे. विशेष म्हणजे मी भाजपची आमदार असलेतरी मदत देताना समोरचे गरजू कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्या जाती धर्माचे आहेत. हे न पाहता ते माझ्या मतदसंघातील असल्याने तसेच आजची त्यांची अडचण पाहता ही सर्व माणसे माझीच समजून मदतीचा हात पुढे करत आहे.
- आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistance to the needy by MLA Bordikar,parbhani news