पोलिस कर्मचाऱ्याचा निरोप समारंभ ठरला शेवटचा, कार दुभाजकावर आदळून नदीत कोसळली

Mahesh Adhatrao
Mahesh Adhatrao

बीड : नेकनूरहून बीडला परतताना अचानक ताबा सुटलेली कार रस्ता दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेला नदीत कोसळली. यात गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावर बीड नजीकच्या खजाना विहीर परिसरात शनिवारी (ता.१२) रात्री घडली. महेश आधटराव असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे बदलीनिमित्त झालेला निरोप समारंभ त्यांच्या आयुष्यातला शेवटचा समारंभ ठरला.


नेकनूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या आधटराव यांची गेवराई पोलिस ठाण्यात प्रशासकीय बदली झाली. शनिवारी रात्री पोलिस ठाण्यातील कर्मचारी व नेकूनरच्या मित्र परिवाराने त्यांच्या बदलीनिमित्त छोटेखानी निरोप समारंभ ठेवला. कार्यक्रम आटोपून ते रात्री कारने (एमएच २३ एएस ६००४) बीडला परतत होते. पाली नजीकच्या खजाना विहीर परिसरात कार रस्ता दुभाजकावर आदळून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला नदीत कोसळली. यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कर्तव्यदक्षतेबरोबरच माणुसकीही जपत
नेकनूर पोलिस ठाण्यात गत सहा वर्षांपासून अधिकाऱ्यांचे रायटर म्हणून ते काम पाहत होते. मूळ सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले महेश आधटराव वर्ष २००६ मध्ये बीड पोलिस दलामध्ये भरती झाले. त्यांनी हेडक्वॉर्टर, पेठ बीड ठाणे, डीएसबी, लाच लुचपत प्रतिबंध विभाग व आता नेकनूर ठाणे अशी १५ वर्षे सेवा केली. पोलिस सेवा काळात त्यांना ६६ बक्षिसे मिळाली.

कर्तव्य दक्षतेबरोबरच त्यांनी कायम माणुसकी जपत सामाजिक कामही केले. नुकतेच लॉकडाउन काळात लिंबागणेशमध्ये वृद्ध दांपत्याची झोपडी वादळी पावसाने पडल्यानंतर स्वत: साहित्य खरेदी करून त्यांनी शेड उभारून दिले आणि दांपत्याला नवे कपडेही घेऊन दिले. माणुसकी जपणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com