esakal | सतत होणारे अपघात पाहवत नसल्याने अखेर पोलिसांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे
sakal

बोलून बातमी शोधा

Latur-Barshi Road

लातूर-बार्शी या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता सातत्याने एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित होत असला तरी रस्त्याला कोणी वालीच उरलेला नाही.

सतत होणारे अपघात पाहवत नसल्याने अखेर पोलिसांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : लातूर-बार्शी या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता सातत्याने एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित होत असला तरी रस्त्याला कोणी वालीच उरलेला नाही. रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारखा मोठा वाली मिळूनही दुरवस्था थांबलेली नाही. रस्त्यावर साखरा पाटी ते मुरूड अकोला दरम्यान मोठे खड्डे पडले होते. खड्ड्यांमुळे अपघात वाढले व काहींचा मृत्यू झाला. मात्र, प्राधिकरणाकडून दुरुस्ती केली जात नव्हती.

इथे तरी विलंब नको! मृत व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल तत्काळ देण्याची गरज

डोळ्यासमोर सतत होणारे अपघात पाहवत नसल्याने शेवटी गातेगाव (ता. लातूर) पोलिस ठाण्याचे जमादार सुग्रीव कोंडामंगले यांनी होमगार्ड व शेतकऱ्यांच्या मदतीने दोन दिवसांत खड्डे बुजवले आहेत. पोलिसांच्या या औदार्यामुळे प्रवासी व वाहनचालकांकडून त्यांचे कौतुक होत असून, दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नावाने प्रवासी बोटे मोडताना दिसत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, असे तीन वाली झालेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

अरुंद रस्ता, मोठे खड्डे व साइडपट्ट्या खराब झाल्याने एका ग्रामीण रस्त्यासारखी महामार्गाची स्थिती झाली आहे. यातच साखरा पाटी व मुरूड अकोला दरम्यान रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे काही दिवसांत अपघात वाढले होते. दोष निवारण कालावधी असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला सांगण्यासाठी कोणीच वाली नव्हता. यात खड्ड्यात जाऊन वाहनांचे नुकसान होण्यासोबत दुचाकीस्वार जखमी होऊ लागले तर एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे मृत्यूही झाला.

हॉटेलचालकांना पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद, वेळ वाढवून देण्याची मागणी

गस्त घालत असताना एकापाठोपाठ एक दोन दुचाकीस्वार डोळ्यादेखत खड्ड्यात पडले. हे पाहून मन हेलावले. यामुळे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. मुरूड अकोलाचे शेतकरी राजकुमार बिडवे व महारूद्र कोरके यांच्या साह्याने व चार होमगार्डच्या मदतीने दोन दिवसांत खड्डे बुजविण्यात आले. पोलिसांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

कामगारांना भोजन अन् चोरीचा तपास
जमादार कोंडामंगले यांच्यातील माणुसकीचा प्रत्यय सातत्याने या भागातील लोकांना येत आहे. लॉकडाउनच्या काळात मजुर व कामगार चालत जात असताना मुरूड अकोला येथे त्यांनी तीन दिवस भोजनाची व्यवस्था केली होती. साखरा येथील जिल्हा परिषद शाळेतील एलएडी व संगणक चोरीचा तीन दिवसांत तपास लाऊन गावातीलच परंतु उस्मानाबाद येथे एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मुद्देमालासह त्यांनी पकडले होते. आता रस्त्यावरील खड्डे बुजवल्यामुळे पोलिसांतील एका भल्या माणसाची ओळख सर्वांना होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर