हनी ट्रॅप प्रकरणातील पोलिस नाईक बडतर्फ,एसपी पोद्दार यांची कारवाई

दत्ता देशमुख
Sunday, 23 August 2020

विटभट्टी चालकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीत सहभाग असलेला पोलिस नाईक कैलास गुजर यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रविवारी (ता.२३) ही कारवाई केली.

बीड : विटभट्टी चालकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीत सहभाग असलेला पोलिस नाईक कैलास गुजर यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रविवारी (ता.२३) ही कारवाई केली. केज तालुक्यातील एक विटभट्टी चालकाशी आष्टी तालुक्यातील एका महिलेने बांधकामासाठी विटा हव्या आहे, म्हणून संपर्क केला.

त्याला मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. नंतर, वाहन नसल्याचा कांगावा करत त्याला अगोदर पाटोदा व नंतर आष्टी येथे वाहनातून सोडण्याची विनंती केली. चहा पिण्याच्या बहान्याने त्याच्याशी लगट करुन याचे व्हिडीओ चित्रण केले. सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पंधरा लाखांची खंडणी मागितली. तडजोडीअंती दहा लाख रुपये देण्याचे ठरले. परंतु, विटभट्टी चालकाने या प्रकरणी नेकनूर येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन यामध्ये कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्या विरुद्ध ब्लॅकमेलिंगचा गुन्हा नोंद करण्यात आला.

कोविड केंद्राला लावले कुलूप, कोरोनाच्या २२ रुग्णांचे रात्रभर झाले हाल

या प्रकरणातील कैलास गुजर हा आष्टी पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत होता. तपासात या प्रकरणात कैलास गुजरचा सहभाग आढळला. गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या कैलास गुजर यास सुरवातीला निलंबित करण्यात आले होते. नंतर आता त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

आयशर टेम्पोने दिली दुचाकीला धडक, अपघातात एकजण ठार

कड्यात मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न
कडा(जि.बीड) : येथील पोलिस चौकीसमोरील अहमदनगर जामखेड मार्गालगत असलेल्या दत्त मंदिरातील दानपेटी चोरांनी गजाने व दगडाने फोडण्याचा प्रयत्न शनिवारी (ता.२२) केला; परंतु तो अयशस्वी झाला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीला ही दानपेटी ट्रस्टच्या सदस्यासमोर उघडली जाते; परंतु दत्त जयंती तीन चार महिन्यांवर असताना शनिवारी मध्यरात्री चोरांनी गज व दगडाने या दत्त मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास या मंदिराचे पुजारी काकासाहेब भालेराव पुजासाठी आले असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी कडा पोलिस चौकीस माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दानपेटीचे कुलूप सुरक्षित असल्याचे सांगितले.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Naik Terminated, SP Poddar Take Action Beed News