पोलिस अधिकाऱ्याने पत्रकारांना धमकावले, बीडमध्ये कारवाईचा प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

बीड येथून उस्मानाबादला बदली झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. यासंदर्भात पत्रकारांनी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन पोलिस महानिरीक्षकांना निवेदन पाठविले. श्री. पोद्दार यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाईल असे आश्‍वासन दिले. 

बीड - बदलीचे वृत्त प्रसिद्ध केल्यावरून सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये पत्रकाराला धमकावणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे विरोधात कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला जाईल. पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना धमकावण्याची भाषा दुर्दैवी असून, असे प्रकार पोलिस खाते खपवून घेणार नाही, असे आश्‍वासन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले. 

बीडमधून तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती. त्याच्या निषेधार्थ बीडमधील पत्रकारांच्या वतीने पोलिस अधीक्षकांमार्फत विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आले. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

सहायक पोलिस निरीक्षक मुंढेची काही दिवसांपूर्वी बीडला बदली झाली होती. मात्र, बुधवारी आठवडाभराच्या आतच त्यांची पुन्हा उस्मानाबादला बदली करण्यात आली होती. यासंदर्भातील बातमीवरून गणेश मुंढे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल अवमानकारक भाषा वापरून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती. या प्रकारचा निषेध करत पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन दिले आणि कारवाईची मागणी केली.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

यावेळी पोद्दार यांनी सदर भाषा ही पोलिस विभागाची भूमिका असू शकत नाही, घडलेला प्रकार दुर्दैवी असून, पोलिस विभागालादेखील शोभणारा नाही. एक पोलिस अधिकारी अशा पद्धतीने वागत असेल, तर त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव आपण पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवू, असे आश्वासन दिले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Officers Threatened Journalists In Beed