खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन, निराधार व्यक्तींना दिले जातेय अन्न

सुशांत सांगवे
बुधवार, 25 मार्च 2020

बसस्थानक असेल किंवा रेल्वे स्टेशन, अशा भागांत ज्यांच्या डोक्यावर छत नाही अशा निराधार व्यक्ती पाहायला मिळतात. संचारबंदीच्या काळात ते पोट कसे भरणार, असा प्रश्न कोणाला पडला नसेल. पण, पोलिसांना आणि काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना हा प्रश्न पडला. त्यानंतर दुसऱ्या क्षणाला शहरातील निराधार व्यक्तींना अन्न आणि पाणी द्यायला त्यांनी सुरवात केली.

लातूर  :  बसस्थानक असेल किंवा रेल्वे स्टेशन, अशा भागांत ज्यांच्या डोक्यावर छत नाही अशा निराधार व्यक्ती पाहायला मिळतात. संचारबंदीच्या काळात ते पोट कसे भरणार, असा प्रश्न कोणाला पडला नसेल. पण, पोलिसांना आणि काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना हा प्रश्न पडला. त्यानंतर दुसऱ्या क्षणाला शहरातील निराधार व्यक्तींना अन्न आणि पाणी द्यायला त्यांनी सुरवात केली.

इतकेच नव्हे तर त्यांना 'कोरोना'पासून काळजी घेण्याचा सल्लाही दिला जात आहे.
शहरातील गर्दीच्या ठिकाणी बेघर व्यक्ती पहायला मिळतात. बसस्थानक, रेल्वेस्थानक हेच त्यांचे छत बनलेले असते. इथल्या कर्मचाऱ्यांनी हुसकावून दिले की या रस्त्याकडेला पाहायला मिळतात. येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून भीक मागून ते जगत असतात. पण, सध्या कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लागू झालेल्या संचारबंदीमुळे रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नाही. हॉटेल, अन्नपदार्थ विक्रीचे गाडे बंद झाल्याने बेघर, निराधार लोकांनी पोट कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पण, काही जागरूक सामाजिक संस्था पुढे येत आहेत.

वाचा ः कोरोनामुक्तीच्या संकल्पाने लातूरात नववर्षाचे स्वागत, घरोघरी उभारली गुढी

पोलिसांच्या मदतीने निराधार व्यक्तींपर्यंत ते अन्न पोचवत आहेत. यासाठी अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी रुद्र प्रतिष्ठानला परवानगी दिली आहे. पोलिसांच्या दामिनी पथकाच्या वाहनातून हे अन्न बसस्थानक, रेल्वेस्थानक, गंजगोलाई, गांधी चौक यासह शहराच्या वेगवेगळ्या भागातील निराधार व्यक्तींना दिले जात आहे. दामिनी पथकाच्या सुदामती वंगे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी, प्रतिष्ठानचे सुमित दीक्षित, जावेद शेख, दिग्विजय पांचाळ, गणेश देवमाने, धीरज चिंचोले हे धडपड करत असताना दिसून येत आहे. संचारबंदीमुळे ज्यांना आपल्या गावी जाता आले नाही, अशा विद्यार्थांना आणि खासगी चालकांनाही पोलिसांच्या मदतीने रुद्र प्रतिष्ठानने अन्न पोचवायला सुरवात केली आहे, असेही सांगण्यात आले.

निराधार व्यक्तींच्या मदतीसाठी काही सामाजिक संस्था पुढे येत आहेत. त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक निराधार व्यक्तिपर्यंत पोचत आहोत. कोणीही उपाशी राहू नये, म्हणून हा प्रयत्न केला जात आहे. याची जबाबदारी दामिनी पथकावर सोपवली आहे.
- हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Staffs Distribute Food To Poor People, Latur