काँग्रेसचा शासनाला घरचा आहेर; 'शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडू नका ...अन्यथा रस्त्यावर'

राम काळगे
Thursday, 18 February 2021

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांचा विज कंपनीला इशारा 

निलंगा (लातूर): ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडू नका अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी बुधवारी ता. 17 रोजी पत्रकार परिषदेत दिला. यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना काँग्रेसनेच आंदोलनाचा इशारा देऊन घरचा आहेर दिला असल्याचे बोलले जात आहे. 

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार व उर्जामंत्र्यानी आडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी धोरण राबवित वीजबिल भरण्यासाठी सवलत व मोठी सुट दिली आहे. त्या धोरणाची योग्य अमलबजावणी प्रशासकीय स्तरावर चुकीच्या पद्धतीने करून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. असा आरोप प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यानी केला.

शिवाय शासनाच्या परिपत्रकानुसार  कृषी ग्राहकांची सुधारित थकबाकी रक्कम ही सप्टेंबर २०२० च्या बिला नुसार गोठवण्यात आलेली असून सदर रकमेचे कुठलीही व्याज किंवा विलंब आकार लागणार नाही. ही रक्कम ग्राहकास सवलतीच्या काळात म्हणजेच पुढील तीन वर्ष (३१मार्च२०२४) पर्यंत भरण्याची सुविधा ग्राहकास देण्यात आलेली आहे. सप्टेंबर २०२० या बिलातील गोठविण्यात आलेली थकबाकी मुळे कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करू नये असे असतानाही निलंगा तालुक्यात कृषी पंपाचे कनेक्शन महावितरणाकडून तोडले जात असल्याचे सांगून हि चुकीची बाब असून शेतकऱ्यांना चालू बिले भरण्यासाठी जनजागृती करणे, वसुलीसाठी ग्रामपंचायतची मदत घेणे असा आदेश परिपत्रकात दिला आहे.

जमा झालेल्या वीज बीलातून त्या गावासाठी ३३ टक्के रक्कम वीज जोडणीच्या कामासाठी तर ३३ टक्के रक्कम पालकमंत्र्यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच खर्च करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनीही जमेल तसे वीजबिल भरण्यासाठी मदत करावीत एखादा शेतकरी बील भरत नसेल तर थेट वीज कनेक्शन न तोडता प्रथम त्यास कलम ५६ नुसार नोटीस द्यावी. विजबील संदर्भात शेतकऱ्यांची काही तक्रार असेल तर त्या तक्रारीचे निवारण करूनच वसुलीची प्रक्रिया करावी थेट वीज कनेक्शन आपणास तोडता येणार नाही. जर असा प्रकार घडला तर काॅग्रेस शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला.

निवेदनावर अभय सोळूंके, जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, अजगर अन्सारी, राजप्पा वारद, अँड. संदीप मोरे, माधवराव पाटील, गिरीश पात्रे, सुरेंद्र महाराज, अमोल सोनकांबळे आदीच्या स्वाक्षर्या आहेत. 

महावितरणाला निवेदन-
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभे टाकले आहे. मुख्यता काॅग्रेस पक्षाची कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमिका घेतली आहे. कोरोनाच्या संकट काळातही शेतकऱ्यांच्या अडचणीत सरकारने मदतीचा हात दिला आहे. महावितरण कार्यालयाने सरकारच्या परिपत्रकानुसारच कारवाई करावी. आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political news in marathi farmer light bill congress agitation