बीडमध्ये शिवसेना, कॉंग्रेसला राष्ट्रवादीने दाखविला हात 

दत्ता देशमुख
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

बीड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीत राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेनेला मात्र राष्ट्रवादीने हात दाखविला.

बीड - जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी शुक्रवारी (ता. 24) बिनविरोध झाल्या. परंतु, या निवडीत राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेनेला मात्र राष्ट्रवादीने हात दाखविला. जयसिंह सोळंके, यशोदाबाई जाधव, सविता मस्के व कल्याण अबुज यांच्या बिनविरोध निवडी झाल्या. दरम्यान, सभापतींच्या निवडी बिनविरोध होणार हा "सकाळ'ने शुक्रवारच्या अंकात व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला.

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस एकत्र आले. भाजपच्या चिन्हावर विजयी झालेल्या चार सदस्यांचे मतदानही भाजप विरोधात पडले. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिवकन्या सिरसाट, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचेच बजरंग सोनवणे यांची निवड झाली होती.

हेही वाचा - निवडणूक काळातील खर्चाची उड्डाणे, बीडमध्ये झाडाझडती

शुक्रवारी विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी विशेष बैठक झाली. यात समाजकल्याण सभापतीपदी कल्याण आबुज, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी यशोदाबाई जाधव यांची निवड झाली. या दोघांसह जयसिंह सोळंके व सविता मस्के यांची निवड झाली. 

हेही वाचा - नगर-बीड-परळी लोहमार्गासाठी शासनाकडून 63 कोटींचा निधी

तीन माजी सभापतींचा भ्रमनिरास 
मागच्या वेळी भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने या वेळी महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. तर, त्या वेळी युद्धाजित पंडित बांधकाम सभापती होते. भाजपसोबत शिक्षण व आरोग्य सभापती असलेले कॉंग्रेसचे राजेसाहेब देशमुखदेखील या वेळी महाविकास आघाडीकडेच होते. तसेच भाजपच्याच चिन्हावर विजयी झालेल्या महिला व बालविकास सभापती असलेल्या शोभा दरेकर यांनीही राष्ट्रवादीला साथ दिली होती. या तिघांपैकी एकालाही सभापतीपद मिळाले नाही.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात परिवर्तन पतसंस्थेच्या दोन संचालकांना बेड्या

दरम्यान, यशोदाबाई जाधव यांना सभापतीपद मिळाले असले तरी त्यांना शिवसेनेतून फोडून राष्ट्रवादीच्या पंडित गटात घेऊन सभापतीपद देण्यात आले. सभापती झालेल्या सविता मस्के या भाजपकडून विजयी झालेल्या असून त्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीला साथ दिली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics In Beed District