फुलशेतीने दिले जगण्याचे बळ

phulsheti
phulsheti

वारंगाफाटा(जि. हिंगोली): कळमनुरी तालुक्‍यातील तोंडापूर येथील शेतकरी दाम्पत्याने पारंपरिक पिकांना फाटा देत फुलशेतीला पसंती दिली. स्वत:च पुष्पहार तयार करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. यातून दरवर्षी ते साडेतीन लाख रुपयांची उलाढाल करीत आहेत.


कळमनुरी तालुक्‍यातील तोंडापूर येथील अल्‍पभूधारक शेतकरी बालाजी थोरात यांना दोन एकर शेती आहे. त्‍यांच्या शेतात असलेल्या बोअरवेलला मुबलक पाणीदेखील आहे. दरवर्षी पारंपरिक पिके घेतात. यात सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचा समावेश आहे. मात्र, यात त्‍यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे त्यांनी जोडव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 

फुलशेतीसाठी ठिबकचा वापर

शेतातील पाण्यावर एका एकरात विविध फुलांची लागवड करण्याची कल्पना सूचली. त्यानंतर त्‍यांनी वीस गुंठ्यांत गलांडा, वीस गुंठे निशिगंध, वीस गुंठ्यांत झेंडू व पाच गुंठ्यांत गुलाब काड्याची लागवड केली आहे. यासाठी त्‍यांना त्‍यांच्या पत्‍नी सपना थोरात यांची साथ मिळाली. या फुलांना पाणी देण्यासाठी त्‍यांनी ठिबकचा वापर केला.

दररोज तीस ते चाळीस किलो फुलांचे उत्पादन

या दोघा पती-पत्‍नीने फुलांची विक्री करण्यापेक्षा पुष्पहार तयार करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. गावापासून जवळच असलेल्या वारंगाफाटा येथे पुष्पहार विक्रीचे स्‍टॉल सुरू केले. सकाळी सात ते बारा या वेळात पुष्पहार विक्री केली जाते. त्‍यानंतर दोघे शेतातील फुले तोडतात. दररोज तीस ते चाळीस किलो फुले निघतात. रात्रीला लहान- मोठे पुष्पहार तयार करून सकाळी वारंगाफाटा येथील विविध दुकानांत पुष्पहारांची विक्री करतात.

महिण्याला पंचवीत ते तीस हजारांचे उत्पन्न

महिण्याला पंचवीस ते तीस हजारांचे उत्‍पन्न पुष्पहाराच्या विक्रीतून मिळत आहे. वर्षाकाठी तीन ते साडेतीन लाख रुपये यातून मिळतात. त्यामुळे संसारासाठी मोठा आधार मिळत आहे. दसरा, दिवाळीला मोठ्या प्रमाणावर झेंडूची मागणी असल्याने फुले खरेदीसाठी गर्दी असते.

अपुऱ्या शेतीतही उत्पन्न

अपुरी शेती असल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाहासाठी फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. त्‍यानंतर पत्‍नी सपना थोरात हिने पुष्पहार विक्री करण्याचा सल्‍ला दिला. दोघांच्या विचाराने हा व्यवसाय सुरू केल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी मोठी मदत झाली.

 -बालाजी थोरात, पुष्पहार विक्रेते
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com