परभणीत महामानवास अभिवादनासाठी रांगा

कैलास चव्हाण
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

- हजारो अनुयायांनी घेतली सामुदायिक वंदना
- समता सैनिक दलाचे पथसंचलन
-  पंचशिल ध्वजवंदन 
- महिला मंडळाच्यावतीने अभिवादन फेरी

 

परभणी : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी  (ता.सहा) हजारो अनुयायांनी स्टेशन रस्त्यावरील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन  केले.

 

परभणी येथील स्टेशन रोडवर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराला आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुशोभित करण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी अभिवादनासाठी अनुयायांनी गर्दी केली होती. सकाळी सामुदायिक बुध्द वंदना घेण्यात आली. तसेच पंचशिल ध्वजवंदन करण्यात आले. समता सैनिक दलाने छत्रपती शिवाजी चौक ते डॉ. आंबेडकर पुतळा असे पथसंचलन करत मानवंदना दिली. तसेच भारतीय बौध्द महासभा, सम्यक संबुध्द बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठाण, समता सैनिक दल, बौध्द अधिकारी, कर्मचारी उपासक संघ, बामसेफ युनीट, धम्ममैत्री संवाद अभियान, सर्व महिला मंडळ यांच्यावतीने शहरातून अभिवादन फेरी काढण्यात आली. अभिवादनासाठी नागरीकांच्या रांगा लागल्या होत्या. विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी  यांच्यासह नागरीकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त 
पुतळा परिसरात जमलेल्या गर्दीतील नागरीकांना चहा - पाण्याची व्यवस्था देखील काही सामाजिक संस्थाच्यावतीने करण्यात आली होती. या भागात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त देण्यात आला होता. या भागात आंबेडकरी विचारावर आधारीत पुस्तक प्रदर्शन भरवले होते. या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश ठेवण्यात आला होता. या कलशाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

 ‘आरएसएस’चे पथसंचलन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शहरात पथसंचलन करण्यात आले. संघाच्यावेषेत मोठ्यासंख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pray t0 Dr. Babasaheb Ambedkar