वैद्यकीय महाविद्यालयासाठी पूर्वपाहणी पथक पाठविणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन : खा.राजीव सातव यांनी घेतली भेट

राजेश दारव्हेकर
Wednesday, 25 November 2020

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हिंगोलीला लवकरच पूर्वपाहणी पथक पाठविणार असून सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन खा.सातव यांना दिले. 

हिंगोली  :  हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी खासदार राजीव सातव यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्यानंतर आणखी एक पुढचे पाऊल पडले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हिंगोलीला लवकरच पूर्वपाहणी पथक पाठविणार असून सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन खा. सातव यांना दिले. 

मुंबईत अतिथी सह्याद्री सभागृहात झालेल्या या बैठकीस पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, खा. राजीव सातव, आमदार राजू नवघरे आदींची उपस्थिती होती. हिंगोली जिल्ह्यात व आसपासच्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सुविधा मिळण्याकरिता अडचणी निर्माण होतात. सद्यस्थितीत जिल्हा पातळीवर रुग्णालय उपलब्ध असलेल्या ठिकाणी तिथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये २०० खाटांचे सुसज्ज जिल्हा रुग्णालय उपलब्ध असून वैद्यकीय उपकरणे व मनुष्यबळदेखील उपलब्ध आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३०० खाटांची व्यवस्था लागते, असे सांगण्यात आले. येथे जिल्हा महिला रुग्णालय प्रस्तावित असून ते सुरू केल्यास ही समस्याही सुटणार असल्याचे खा. सातव यांनी मंत्री देशमुख यांना सांगितले. त्यावर त्यांनी पूर्वपाहणीसाठी पथक पाठविण्याचे आश्वासन देत जागा पाहणी करण्यात येईल, असे सांगितले.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी लागणारी जागा असणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे ते हस्तांतरीत करावी लागणार आहे. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करण्यात येईल त्यानुसार लवकरच संबंधित अधिकाऱ्यांकडून हिंगोलीत यासंदर्भात चाचपणी करण्यात येणार असल्याचे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गायकवाड यांनीही जिल्हा प्रशासन व रुग्णालय प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात येतील. 

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre-inspection team to be sent for medical college, assurance of Medical Education Minister: MP Rajiv Satav called on him hingoli news