esakal | 'नाफेड'कडून सोयाबीनसह उडीद, मूग खरेदीची तयारी 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र.

'नाफेड'कडून सोयाबीनसह उडीद, मूग खरेदीची तयारी 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना -  नाफेडकडून सोयाबीन, उडीद, मूग खरेदी केंद्रची सुरू करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. खरेदी केंद्रासाठी उपअभिकर्ता म्हणून "नाफेड'कडे सात प्रस्ताव दाखल झाले आहे. या प्रस्तावांची बुधवारपर्यंत (ता. 28) छाननी करण्याची मुदत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात "नाफेड'चे सोयाबीन, उडीद, मूग खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात यावर्षी अल्प पाऊस झाला असला तरी सोयाबीनसह उडीद, मुगाचा पेरा अधिक झाला आहे. त्यामुळे नाफेडने जिल्ह्यात उडीद, मूग, सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नाफेडच्या खरेदी केंद्र उपअभिकर्ता म्हणून खरेदी विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी संस्था, सहकारी संस्था, खासगी बाजार समित्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. 

जालना तालुक्‍यातून जालना खरेदी-विक्री संघ, जडाई ऍग्रो प्रोड्युसर कंपनी, भोकरदन तालुक्‍यातून पूर्णा केळणा कंपनी, राजुरेश्‍वर सहकारी संस्था, जाफराबाद तालुक्‍यातून पूर्णा सहकारी खरेदी संघ, मंठा तालुक्‍यातून नानसी सहकारी संस्था, अंबड तालुक्‍यातून अंबड तालुका खरेदी-विक्री संघ, घनसावंगी तालुक्‍यातून घनसावंगी तालुका खरेदी-विक्री संघ असे सात प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावाची बुधवारपर्यंत छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर "नाफेड'कडून उपअभिकर्ता निश्‍चित केला जाईल, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांनी दिली. 

दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्या तर पुढील महिन्यात जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

सोयाबीनचा पेरा सर्वाधिक 
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार यावर्षी एक लाख 30 हजार 282 हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ 20 हजार 20 हेक्‍टरवर मूग, तर 11 हजार 293 हेक्‍टर क्षेत्रावर उडिदाचा पेरा झाला आहे. 

असे आहेत हमीभाव 
केंद्र शासनाकडून यावेळी मुगाला प्रतिक्विंटल सात हजार 50 रुपये, उडिदाला प्रतिक्विंटल पाच हजार 700, तर सोयाबीनाला प्रतिक्विंटल तीन हजार 710 रुपये हमीभाव जाहीर केले आहे. 

loading image
go to top