‘कोरोना’ला रोखण्यासाठी डॉक्टरची दुचाकीवरून जागृती

file photo
file photo

जिंतूर (जि.परभणी) : स्वता:च्या वैद्यकीय व्यवसायात सतत व्यस्त असलेले डॉ. इरफान पटेल हे ‘कोरोना’ जनजागृतीसाठी चार दिवसांपासून रस्त्यावर उतरले आहेत. गल्लीबोळांत फिरून ध्वनिक्षेपकाद्वारे सुरक्षित अंतर ठेवण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून सांगत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ते दूर करण्यासोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सुरक्षित अंतर अधिक भर देत असल्याचे ते सांगत आहेत. जिंतूर शहरातील बहुसंख्य भागात लॉकडाउनमध्ये टाईमपास म्हणून युवक एकत्र येऊन गप्पा मारत बसत आहे. यामुळे सुरक्षित अंतराच्या उद्देशाला हरताळ फासली जात आहे.
त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी सुरक्षित अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) महत्त्व पटवून देण्यावर डॉ. पटेल भर देत आहेत. शिवाय खबरदारी म्हणून दर अर्ध्या तासाच्या अंतराने हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि खोकलताना-शिंकताना नाका-तोंडावर रुमाल वापरणे, गर्दीचे ठिकाण टाळणे या विषयी माहिती देत आहे. जर कोणाला सर्दी-खोकला-ताप असेल तर त्यांनी त्वरित डॉक्टरांना दाखवून आवश्यकतेप्रमाणे औषधी घेण्याचा सल्ला देत आहेत.

हेही वाचा ...

मजुरांना अन्नधान्याची मदत
सोनपेठ (जि.परभणी) :
सोनपेठ तालुक्यात अडकलेल्या १०० हून अधिक मजुरांना गटविकास अधिकारी सचिन खुडे प्रयत्नामुळे पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध झाले आहे.
सोनपेठ तालुक्यात लॉकडाउनमुळे छत्तीसगड, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश, तेलंगाणा, चंद्रपूर आणि रायगड जिल्ह्यातील शंभरहून अधिक मजूर अडकून पडले आहेत. तालुक्यातील विटा, डिघोळ, शिरोरी व भाऊचा तांडा येथे हे मजूर थांबले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील तीस ऊसतोड मजूर सातारा जिल्हातून गावाकडे परत जाताना टोळी मालकाने सोनपेठ तालुक्यात सोडून दिले. भाऊचा तांडा येथील भगवान राठोड व बाबूराव जाधव यांनी या मजुरांना रुग्णालयात तपासणी करून आपल्या तांड्यावर शेतात आसरा दिला.

पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध

या तीस मजुरांची माहिती सोनपेठचे गटविकास अधिकारी श्री. सचिन खुडे यांना कळताच त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी श्री. पृथ्वीराज यांना कळविली. त्यांनी जिल्हा परिषद कंत्राटदार संघटना यांच्यातर्फे लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परिवारांना पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध करून दिले. हे अन्नधान्य गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी मजूर थांबलेल्या ठिकाणी विटा, डिघोळ, शिरोरी भाऊचा तांडा येथे जाऊन दिले. मजुरांना लहान मुलांची काळजी घेण्याच्या तसेच शेतात उघड्यावर राहिलेल्या लोकांना शाळेत आसरा देण्याच्या सूचना दिल्या. या वेळी जवळच असलेल्या शेतातील धनगर कुटुंबीयांची चौकशी केली व त्यांनाही मदत दिली. या वेळी नायब तहसीलदार साहेबराव घोडके, पंचायत समितीचे अविनाश माळी, सुधीर बिंदू उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com