esakal | आरटीपीसीआर टेस्टसाठी परभणीत प्राथमिक शिक्षक उदासिन
sakal

बोलून बातमी शोधा

corona

शासनाने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केल्या असली तरी शासकीय व खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग या चाचणी करण्याबाबत उदासिन असल्याचे चित्र परभणीत आहे. 

आरटीपीसीआर टेस्टसाठी परभणीत प्राथमिक शिक्षक उदासिन

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

परभणी ः शासनाने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केल्या असली तरी शासकीय व खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग या चाचणी करण्याबाबत उदासिन असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत तरी अपवाद वगळता बहुतांश खासगी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकच या टेस्ट करून घेत असल्याचे दिसून येते. 

राज्यातील शाळा शनिवार (ता.२१) पासून सुरु होत आहेत तर इयत्ता नववी ते बारावीची शाळा, वर्ग सोमवार (ता.२३) पासून सुरु होणार आहेत. शासनासह जिल्हा प्रशासन, शिक्षण विभागाने सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळा सुरु होण्यापुर्वी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी गुरुवारी (ता.१९) शिक्षणाधिकारी (प्रा./मा.), मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. टेस्ट निगेटिव्ह आलेल्या शिक्षकांनाच शाळेत प्रवेश द्यावा, रिपोर्ट न आलेल्या शिक्षकांना शाळेत येऊ न देता त्यांची रजा घ्यावी, असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तरांना ही टेस्ट करणे अनिवार्य झाले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने ता. १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान टेस्ट करून घ्यावी, असे आदेशच काढले आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनी चाचणी केल्याचा संकलीत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिले आहेत. 

हेही वाचा - हिंगोली : नर्सी येथे संत नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती महोत्सवाला सुरुवात

प्राथमिक शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था, उदासिनता 
ता. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. आमचे वर्ग सुरु होणार नाही, विद्यार्थी येणार नाहीत, तर मग टेस्ट कशाला ? अशी अनेक प्राथमिक शिक्षकांमध्ये भावना निर्माण झाली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे अपवाद वगळता बहुतांश प्राथमिक शिक्षकांनी या केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. जोपर्यंत टाळता येईल तो पर्यंत टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.  

हेही वाचा - हिंगोली : नागनाथ मंदीर उघडले आता नागनाथ उद्यान सुरु करा, भक्तांची मागणी 

गंगाखेड तालुक्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचणीस सुरुवात 
गंगाखेड : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावी वर्ग सुरू करण्याच्या हालचाली केल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचणीस (ता.१९) पासून आरोग्य विभागाने प्रारंभ केला. शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या २३ नोव्हेंबरपासून कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत वर्ग सुरू करण्यात यावे असे आदेश निर्गमित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक केले असून तशा सूचना आरोग्य विभागास दिल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामीण भागातील ४५० खाजगी व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची कोरोना चाचणी प्रत्यक्ष शाळेत जाऊन आरोग्य विभाग करत असून (ता.१९) रोजी १३५ शिक्षकांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. (ता.१९ ते २१) दरम्यान तालुक्यातील व शहरातील सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार यांनी दिली.
 
स्वच्छतेच्या संदर्भात शाळा सुरू करताना काळजी घ्यावी ः शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ 
सेलू ः इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा (ता.२३) पासून सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासन व मुख्याध्यापकांनी स्वच्छतेच्या संदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी दिले. कोविडच्या पार्श्वभूमीवर ज्या स्वच्छते संदर्भात नियम सांगितले त्याचे काटोकोरपणे पालन करावे. मास्क वापरणे, हात सॅनिटाझरने धुणे व सुरक्षित अंतर या तीन बाबीवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा व परिसर, वर्गखोल्या, कार्यालय हे निर्जंतुकीकरण करून घेणे, विद्यार्थी एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर राहतील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना देखील स्वच्छतेच्या बाबतीतील मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करून देणे गरजेचे आहे. नववी ते बारावीला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी घेणे सूरू असून प्रत्येक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करूनच शाळेमध्ये प्रवेश करावा. अध्यापन करताना शिक्षकांनी स्वच्छतेच्या बाबती मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. अध्यापन कार्यासोबतच कोरोनाचा फैलाव होऊ नये, याची काळजी शाळांनी घ्यावी, असे निर्देश डॉ. वंदना वाहुळ यांनी दिले. 


संपादन ः राजन मंगरुळकर