Video : आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा, आणि पुढे काय झाले... ते वाचा

नवनाथ येवले
Friday, 6 March 2020

जागतिक महिला दिनानिमित्त सीटूचे देशव्यापी आंदोलन ; मोर्चा, रास्तारोको, जेलभरो घोषणाबाजीने दणाणली जिल्हा परिषद 

नांदेड : जागतिक महिला दिनानिमित्त सीटू संघटनेच्या देशाव्यापी आंदोलनामध्ये आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सीटू) जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी (ता. सहा मार्च २०२०) आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले. दरम्यान मोर्चेकरी महिलांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. जिल्हाध्यक्षा उज्वला पडलवार, गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

केंद्र सरकाराच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ लाल बावटा प्रणित सीटू संघटनेतर्फे देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सीटू) संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या जिल्हाध्यक्षा उज्वला पडलवार, गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आशा, गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजी धोरणांवर टिका करत मागण्या मंजूर करण्याच्या भावना व्यक्त केल्या. 

हेही वाचायशोदामाता पुरस्कार वितरण सोहळ्यावर रोषाचे ग्रहण - कुठे ते वाचा

सीईओंच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न
राज्य व जिल्हास्तरावरील प्रलंबित मागण्या प्रशासन दरबारी मांडण्यासाठी मोर्चेकरी महिलांनी घोषणाबाजी करत मुख्य कार्यकारी आधिकारी अशोक काकडे यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच दालन कूलुप बंद केल्यामुळे आंदोलनकर्त्या महिलांनी दालनासमोर ठिय्या मांडला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) डॉ. सुधीर ठोंबरे यांनी मोर्चेकरी महिला व शिष्ठमंडळाशी चर्चा करत जिल्हास्तरावरील मागण्या येत्या आठवडाभरात मार्गी लावून राज्यस्तरावरील मागण्या शासनास कळवल्याचे अश्वासन दिले. 

हेही वाचा अध्ययन निष्पत्तीत विद्यार्थी बनताहेत स्मार्ट, कसे ते बघाच

आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका
जिल्हा परिषद प्रशासानातील अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आंदोलनकर्त्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडला. वजिरबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. शिवले महिला पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान, संघटनेच्या जिल्हाध्यक्ष उज्वला पडलवार, गंगाधर गायकवाड हे जेलभरो आंदोलनावर ठाम असल्याने पोलिस निरीक्षक श्री. शिवले यांनी आंदोलनकर्त्या महिलांना वजिराबाद पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करून सुटका केली. 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध 
केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायदा ( सीएए, एनआरसी, एनपीआर) विरोधात मोर्चेकरी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. शासनस्तरावरून ‘एनपीआर’ची प्रक्रीया सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या असल्या तरी, एनपीआरसाठी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती न देण्याचा निर्धार या वेळी आंदोलनकर्त्या महिलांनी केला. पिढ्या न पिढ्या या देशाचे नागरिक असताना एनपीआर आमचे नागरिकत्व ठरवणार असेल तर या देशात लोकशाही उरली आहे का असा उलट प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. आंदोलनकर्त्या महिलांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prison Fellows of Hope and Feminist Federation