उमरगा : पाणी वापर संस्थेची प्रक्रिया आणखी कागदावरच ! मृद व जलसंधारण विभागाकडून मिळेनात पाणी परवाने

अविनाश काळे
Wednesday, 16 December 2020

उमरगा येथील पाटबंधारे विभाग क्रमांक दोन अंतर्गत सर्वाधिक ६५ सिंचन प्रकल्प तुळजापूर तालुक्यात आहेत, तर उमरगा तालुक्यात ३२ तर लोहारा तालुक्यात १६ सिंचन प्रकल्प आहेत.

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यात असलेल्या विविध प्रकारच्या ११३ सिंचन प्रकल्पाखाली येणाऱ्या ५६ हजार हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी यंदाच्या पाणी उपल्ब्धतेनुसार २०२०-२०२१ या वर्षासाठी २७ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे. तीन तालुक्याच्या सिंचन क्षेत्रातील जवळपास ५० हजार लाभार्थी शेतकऱ्यांपैकी सात हजार शेतकऱ्यांना पाणी परवाने देण्यात आले आहेत, अजूनही मागणी प्रमाणे या विभागाकडून परवाने दिले जाताहेत. मात्र, मृद व जलसंधारण विभागाकडून पाणी वापर परवाने दिले जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा रितसर वापर करण्यासाठी अडचणी येत आहेत.

हे ही वाचा : जळकोट बाजार समिती बरखास्त, प्रशासकपदी वाघमारे यांची नियुक्ती

उमरगा येथील पाटबंधारे विभाग क्रमांक दोन अंतर्गत सर्वाधिक ६५ सिंचन प्रकल्प तुळजापूर तालुक्यात आहेत, तर उमरगा तालुक्यात ३२ तर लोहारा तालुक्यात १६ सिंचन प्रकल्प आहेत. यंदा मुबलक पाऊस झाल्याने जवळपास सर्वच प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने तीन तालुक्यासाठी २७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी विभागाने उद्दिष्टय ठेवले आहे. यंदा नव्याने ५० पाणी परवाने देण्यात आले असून लाभ क्षेत्रातील जवळपास ५० हजार शेतकऱ्यांपैकी सात हजार शेतकऱ्यांकडे पाणी परवाने आहेत. अधिकृत परवाने घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, मृद व जलसंधारण विभागाची स्थिती उलट आहे, या विभागाकडे असलेल्या चिंचोली (पळसगांव), जगदाळवाडी साठवण तलावाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वैयक्तिक पाणी परवाने दिले जात नाहीत. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेमार्फत पाणी घ्यावे, असे शासनाचे आदेश असल्याचे उपविभागीय अभियंता राम फुगटे सांगताहेत.

पाणी वापर संस्थेची प्रक्रिया आणखी कागदावरच !

जून्या अध्यादेशानुसार २८ सहकारी पाणी संस्था होत्या. त्या बरखास्त करण्यात आल्या आहेत, २००५ च्या नवीन अध्यादेशानुसार नोटीशिफिकेशन एक, दोन व तीन ही प्रक्रिया करावी लागते. येथील पाटबंधारे विभागाने नोटीशिफिकेशन एक, दोनसाठी शासनस्तरावरून मंजूरी मिळाली आहे. आता नोटीशिफिकेशन तीनची प्रक्रिया सुरू आहे, त्यासाठी जलसंपदा विभागाच्या संबंधित वरिष्ठ कार्यालयाची मंजूरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पाणी वापर संस्थेची रितसर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. दरम्यान, सध्या फक्त तुळजापूर तालुक्यात १४ पाणी वापर संस्था आहेत.

वीस लाख पाणीपट्टीची झाली वसुली

उमरगा येथील उस्मानाबाद पाटबंधारे विभागाची (क्रमांक दोन) गेल्या अनेक वर्षापासूनची सिंचन व बिगर सिंचनाची एकूण थकबाकी सहा कोटी ५८ लाख  रुपये असली तरी या विभागाला मार्च २०२१ अखेर एक कोटी वसुलीचे उद्दिष्टय आहे. त्यापैकी सद्यस्थितीत २० लाखाची वसुली झाली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The process of water use organization at Umarga is still on paper