परभणी मेडीकल कॉलेजच्या जागेचा अर्थखात्याकडे प्रस्ताव रवाना- खासदार फौजिया खान

गणेश पांडे
Saturday, 9 January 2021

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची श्रीमती खान व अ‍ॅड. गव्हाणे यांनी गुरुवारी (ता.सात) मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. या भेटीतून या दोघांनी उद्योगमंत्री देसाई यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मराठवाडा विकास मंडळाअंतर्गत दुय्यम कंपनीची म्हणजे गोरक्षणची जमीन हस्तांतरित करण्यास परवानगी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

परभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निश्रि्चत केलेल्या गोरक्षणच्या त्या जागेचा रितसर असा प्रस्ताव उद्योग मंत्रालयाव्दारे अर्थखात्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती खासदार श्रीमती फौजिया खान व माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे यांनी दिली.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची श्रीमती खान व अ‍ॅड. गव्हाणे यांनी गुरुवारी (ता.सात) मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. या भेटीतून या दोघांनी उद्योगमंत्री देसाई यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मराठवाडा विकास मंडळाअंतर्गत दुय्यम कंपनीची म्हणजे गोरक्षणची जमीन हस्तांतरित करण्यास परवानगी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी देसाई यांनी या अनुषंगाने अर्थखात्याकडे तांत्रिक मान्यतेकरिता प्रस्तावसुध्दा पाठवण्यात आला आहे, अशी माहिती दिली.

हेही वाचा - हिंगोली नगरपालिका कर वसुलीसाठी आक्रमक; थकबाकीदार मालमत्ताधारकांना धास्ती 

दरम्यान, श्रीमती खान व अ‍ॅड. गव्हाणे यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्याबरोबर अन्य विकास प्रश्नांबाबतची चर्चा केली. विशेषतः औद्योगीक वसाहतीकरिता जागा उपलब्ध करण्यासंदर्भातही व्यापर चर्चा झाली. गोरक्षणचीच सर्वसाधारणपणे चारशे एक्कर जागा उपलब्ध आहे. त्यापैकी काही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच उर्वरित जागा औद्योगीक वसाहतीकरिता उपलब्ध करण्याचा निर्णयसुध्दा उद्योगमंत्रालयाव्दारे घेतला गेला आहे, असे निदर्शनास आणून दिले.यावेळी अप्पासाहेब बालवडकर हे उपस्थित होते.

मेडीकल कॉलेजला लागणाऱ्या जागेची मंजुरी उद्योग विभागाकडून मिळाली असून त्यांनंतर ही फाईल आता अर्थ विभागाकडे गेली आहे. परिणामी अर्थ विभागाची परवानगी मिळाल्यानंतर तातडीने मेडीकल कॉलेजच्या मंजुरीच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for Parbhani Medical College site sent to Finance Department MP Faujia Khan parbhani news