प्रेम प्रकरणातून तरुणाची शिरुर कासार तालुक्यात धिंड

चंद्रकांत राजहंस
बुधवार, 2 मे 2018

मुलीला नारायनवाडी येथे नातेवाईकांकडे सोडले. त्यानंतर गोटू यादवला झाडाला बांधून ठेवले.

शिरूर कासार (जि. बीड) - अल्पवयीन मुलीला पळविल्याच्या कारणाने तरुणास बेदम मारहाण करत शेंदूर फासून धिंड काढल्याची घटना सोमवारी (ता. 30) तालुक्यातील आर्वी येथे घडली. या प्रकरणी बुधवारी (ता. 2) शिरूर पोलिसात 62 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कृष्णा उर्फ गोटू राम यादव (वय 25 रा. आर्वी) याचे गावातीलच एका तरुणीसोबत वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. गेल्या आठवड्यात ता. 25 ला दोघे दुचाकीवरुन औरंगाबादला पळून गेले. त्यानंतर पुणे, कोल्हापूर, पुणे आणि पुन्हा औरंगाबाद असा प्रवास करुन रविवारी (ता. 29) हे युगूल औरंगाबादमधील नक्षत्रवाडी येथील मित्राच्या घरी थांबले. दोघे औरंगाबादला असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलीचे नातेवाईक वाहनातून औरंगाबादला आले. दोघांना वाहनात बसवून निघाल्यानंतर रस्त्याने गोटू यादवला मारहाण करण्यात आली. मुलीला नारायनवाडी येथे नातेवाईकांकडे सोडले. त्यानंतर गोटू यादवला झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावात आल्यानंतर गोटू यादवला जिपमधून खाली उतरवून कपडे काढले, हात पाठीमागून बांधून अंगावर शेंदुर टाकुन आर्वी येथील बाजारतळ व वेशीत आणून उभे केले. त्यानंतर त्याची गावातून धिंड काढण्यात आली. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर शिरुर पोलिसांनी त्याची सुटका करुन त्याला रायमोहा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी हिमंत फरताडे, सुरेश फरताडे, कचरू कदम, बाळु कदम, राधाकिसन भोसले, अंजना फरताडे, पिनु कदम, रामा फरताडे, हरी फरताडे, नारायण फरताडे या सह हालगीवाला व अनोळखी 50 असे एकूण 62 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: public disgrace of boy in shirur taluka