सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ‘वंचित’चे पदाधिकारी रस्त्यावर, कुठे ते वाचा... 

गणेश पांडे
Wednesday, 12 August 2020

परभणी शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी बसस्थानकासमोर आंदोलन करतांना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

परभणी ः सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तातडीने सुरु करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (ता.१२) वंचित बहुजन आघाडीच्यावतीने येथील बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर हे आंदोलन करण्यात आले. त्यानुसार परभणी शहरातील एसटी बसस्थानकासमोर हे आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचा - उर्दू नव्हे तर जागतिक शायरी विश्वातील सूर्याचा अस्त- डॉ. फहीम सिद्दीकी

प्रतिबंधात्मक उपाय योजनामध्ये सुधारणा करा
या आंदोलनात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तातडीने सुरु करण्यात यावी तसेच कार्यालय, दुकाने, हॉटेल, बाजार इत्यादी ज्यामुळे लोकांचा आप- आपसातील संपर्क कमी होईल अश्या प्रकारे सर्व व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले. या चार महिण्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असे वंचित आघाडीच्या आंदोलकांचे म्हणणे आहे. गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय तातडीने सुरु करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाविरुध्द लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे ८० टक्के लोकांनी दाखविली आहे. १५ टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देवून कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. केवळ पाच टक्के लोक हे बळी पडत आहेत. सरकारने २० टक्के लोंकावर उपचार करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. कोरोना नियंत्रणाच्या नियोजनाचे हे सूत्र ठरवले पाहिजेत. शंभर टक्के लोकसंख्येवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत. ८० टक्केपेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार महिण्याचा आढावा घेवून सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली.

हेही वाचा - अपहरणकर्ता विकास हटकरच्या पोलिस कोठडीत वाढ

सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी गैरसोय
एसटी, बेस्ट व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतुक सेवा सरकारने त्वरीत सुरु कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. गणपती उत्सवासाठी खासगी बस वाहतुकीचे बुकींग सुरुवात झाली आहे. खासगी सेवा चालु होत असतील तर सरकारने सरकारी वाहतूक सेवा सुरु करण्यात काय अडचण आहे. सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरु केल्या आहेत. परंतू त्या फारच अपुऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरु करावी व जिल्हा बंदी तातडीने उठवावी अशी मागणीसाठी बुधवारी (ता.१२) बसस्थानकासमोर वंचितच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सिध्दार्थ कांबळे, संपत नंदनवरे, सुमित जाधव, अरूण गिरी, शेषराव जल्हारे, योगेश पांचाळ, उत्तम गोरे, लिंबाजी उजगरे यांची उपस्थिती होती.

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the public transport system, the office bearers of 'Vanchit' are on the road, read where ..., Parbhani News