शेंगाला कोंब फुटताहेत, आता कशानं कर्ज फेडावं साहेब, रात्रभर झोप येत नायं

राम काळगे
Saturday, 19 September 2020

गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकझाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.

निलंगा (जि.लातूर) : आवंदा वेळवर पेरणी झाली..पीक... बी. जोमात आलं होतं. काय तर हाताला लागल असं वाटत व्हतं. अतिवृष्टीच्या पावसामुळे सगळं गेलं. मूग बाबडे झाले. उडीद काळे पडले. अन् आता उभ्या हिरव्या सोयाबीनला कोंब फुटताहेत. जगावं कसं रात्रभर झोप येईना या शब्दात शेतकऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहेत.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन होणार नाही, उच्च शिक्षणमंत्री...  

यंदा जून महिन्यामध्ये मृग नक्षत्रात चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणी वेळेवर झाली. तशी परिस्थिती समाधानकारक असली तरी मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पावसाने काही कालखंड उघडीप दिली होती. त्यामुळे हलक्या प्रतीच्या जमिनीवर व त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून सर्वाधिक पेरा या पिकाचा असताना नगदी पीक म्हणून शेतकरी या पिकाचे उत्पन्नावर भविष्यातील नियोजन करीत असतो.

मुंबई इंडियन्सकडून मराठवाड्याचा दिग्विजय देशमुख खेळणार ‘आयपीएल’

मागील काळात पावसाची उघडीपमुळे शेतकऱ्यांचे मूग हाताला लागले नाहीत. उडीद काळे पडून गेले, अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत असताना गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिकाची परिस्थिती असमाधानकारक झाली आहे. सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पावसामुळे हिरव्या सोयाबीनच्या शेंगाला कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक आपत्तीबरोबर आर्थिक अरिष्ठ आले आहे. शनिवारी (ता.१९) पहाटे निलंगा तालुक्यातील तुपडी, शिवणी-कोतल परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आला आहे.

मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून तालुक्यातील हंगरगा, बडूर, निलंगा, जाऊ, शेडोळ, केदारपुर या प्रकल्पातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मांजरावर व तेरणा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. शिवाय रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील ताजपुर, शिवणी- कोतल , आनंदवाडी- शिवणी कोतल, तुपडी, शेडोळ, हाडगा, ऊमरगा या भागातील ओढ्यांना पूर आला असून लातूर ते निलंगा तुकडी मार्ग हा रस्ता काही काळ बंद होता.

‘एमपीएससी’च्या स्पर्धकांची संख्या पाच लाखांहून पंचवीस लाख,पासष्ट हजार पदांसाठी...

ओढ्याच्या पात्रात बाहेर पाणी पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय मांजरावर तेरणा नदीच्या पात्रात बाहेर पाणी पडत असल्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हिरव्या उभ्या सोयाबीन पिकाला कोंब फुटत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात असलेली उत्पन्न हाताला लागेल की नाही, अशी भीती शेतकऱ्याकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पिकाचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

संपादन- गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulses Damages In Rain Latur News