जीवनावश्यक वस्तुच्या वाहनावर स्टीकर लावा : जिल्हाधिकारी

गणेश पांडे
बुधवार, 25 मार्च 2020

आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत विविध राज्यात ‘कोरोना’ विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत.

परभणी : जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व वितरण वगळण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडचण होऊ नये यासाठी संबंधित आस्थापनाने जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात येईल. अशा वाहनावर ‘जीवनाश्यक वस्तूसाठीचे वाहन’ अशा आशयाचे मोठे स्टीकर वाहनाच्या दर्शनी बाजूवर लावण्यात यावेत, असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत विविध राज्यात ‘कोरोना’ विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तरी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात ता. २३ मार्चपासून पूर्ण लॉकडाऊन घोषित केलेले असले तरी जीवनावश्यक वस्तुंना यातून सूट देण्यात आली असल्याने अशी वाहतूक सुरू असून ही वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला संबंधित आस्थापनेने ओळखपत्र द्यावे. तसेच पोलिसांनी विचारणा केली असता हे ओळखपत्र दाखविण्यात यावे. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 

हेही वाचा व पहा -Video: लढाई निश्चित जिंकणार; पण तुम्ही घर सोडू नका

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून सुचना
राज्यामध्ये ‘कोरोना’ विषाणूच्या संक्रमनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ५ टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेशित केले आहे. कोषागार कामकाजाचे नियमन करण्याच्या दृष्टीने वित्त विभागाचे आदेश ता.२४ मार्च नुसार कोषागार तसेच उपकोषागार कार्यालयात चालू आर्थिक वर्षातील अनूदानाशी निगडीत देयके ता.२७ मार्च पर्यंतच स्विकारण्यात येतील. त्यानंतर ‘कोरोना’ आजाराशी निगडीत देयके वगळता कोणत्याही प्रकारची देयके कोषागार,  उपकोषागारात स्वीकारली जाणार नाही. याची नोंद सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी. असे जिल्हा कोषागार अधिकारी सुनिल वायकर यांनी कळविले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Put a sticker on the essentials: Collector