बीड जिल्‍ह्यात क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू, ५६ स्वॅबचे अहवाल आले 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

  • सोमवारपर्यंत आढळले ४७ कोरोनाबाधीत 
  • तामिळनाडूहून परतले तीनशे मजूर 
  • बीड, माजलगाव व केजमध्ये कोरोनाबाधीतांवर उपचार 
  • बीडमधील दोन रुग्ण जोखमीचे 
  • साखरे बोरगाव परिसरात कंटेन्मेंट झोन 

बीड - जिल्ह्यात मागच्या शनिवारपासून (ता. १६) सुरु झालेले कोरोना रुग्णांचे मिटर थांबायला तयार नाही. अपवाद वगळता रोजच स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत. दरम्यान, रविवारी (ता. २४) सहा नवीन कोरोनाग्रस्त आढळले असून सोमवारी (ता. २५) कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांसह इतर ५६ स्वॅब तपासणीला पाठविले. त्याचे अहवाल उशिरा प्राप्त झाले.

जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधीतांचा आकडा ४७ वर असून यापैकी एक रुग्ण बरा झाला असून एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण पुण्यात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकूण ३९ कोरोनाग्रस्तांवर जिल्हा रुग्णालय (२६), माजलगावचे ग्रामीण रुग्णालय (१२) व केजच्या उपजिल्हा रुग्णालयात (एक) उपचार करण्यात येत आहेत. यापैकी जिल्हा रुग्णालयातील दोन रुग्ण जोखमीचे आहेत.

हेही वाचा - बीडमध्ये सहा कोरोना रुग्ण आढळले, पोलिसांचे अहवाल निगेटीव्ह

दरम्यान, मुंबईहून परतलेल्या आणि गावाबाहेर क्वारंटाईन असलेल्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला असून त्याचा स्वॅबही तपासणीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यात सोमवार पर्यंत ९०० लोकांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासण्यात आले. यापैकी ७८० नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह तर ४७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. १७ थ्रोट स्वॅब नमुन्यांचा प्रयोगशाळेत निष्कर्ष निघाला नसून सोमवारी पाठविलेले ५६ स्वॅबचे अहवाल उशिरा प्राप्त होणार आहेत. 

मुंबई रिटर्न, क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू 
तालुक्यातील नवगण राजूरी येथील एक कुटूंब ता. २० मे रोजी मुंबईहून परतले होते. या कुटूंबाला गावाबाहेर क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील ४० वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. मानसिक विकलांग असलेल्या या व्यक्तीची जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर मृत घोषीत करुन कोरोना चाचणीसाठी त्याचा थ्रोट स्वॅब घेतला आहे. 
साखरे बोरगांव परिसरात कंटेन्मेंट झोन 
तालूक्यातील साखरे बोरगांव येथे कोरोना विषाणूची लागण झालेले तीन रुग्ण रविवारी (ता. २४) आढळून आले. सदर कुटूंब मुंबईहून आलेले होते. त्यामुळे साखरे बोरगाव, वानगाव, गोगलवाडी (ता. बीड) हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला. या ठिकाणी पूर्णवेळ संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine death in Beed district, 56 swabs reported