बीडमध्ये सहा नवीन कोरोनाग्रस्त आढळले, पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह; पुन्हा मुंबई रिटर्नच रुग्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड - प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आदर्श पॅटर्न राबवीत मागचे दोन महिने कोरोना शून्य असलेल्या जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी (ता. २४) पुन्हा नवीन सहा कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता  ४७ झाली आहे; मात्र एका कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या नऊ पोलिसांच्या थ्रोट स्वॅबचे अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले या टप्प्यातील सर्व कोरोनाग्रस्त हे मुंबईहून आलेले आहेत. रविवारी आढळलेल्या रुग्णांत तीन महिला व तीन पुरुष आहेत. मागच्या महिन्यात पिंपळा (ता. आष्टी) येथे जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळला. नगर येथे तपासणी व उपचारानंतर तो बरा झाला. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोना शून्यच होता. दरम्यान, मागच्या शनिवारी (ता. १६) पहिल्यांदा दोन आणि दुसऱ्याच दिवशी सात रुग्ण आढळले. त्यानंतर चार दिवसांपूर्वी एकाच दिवशी १३ कोरोना रुग्ण आढळून आले.

 जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी (ता. २३) ४१ वर पोचली होती. रविवारी त्यात सहाने वाढ होऊन हा आकडा ४७ वर पोचला. दरम्यान, एका महिलेचा मृत्यू झाला असून, सहा जण पुण्याला उपचाराला गेले आहेत. दरम्यान, शनिवारी शहरातील पालवण चौक भागातील रहिवासी असलेला एक कोरोनाग्रस्त आढळला होता; मात्र तो मुंबईहून येत असलेले वाहन पोलिसांनी तपासले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या नऊ पोलिसांसह ४० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यात पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

येथे आढळले नवीन रुग्ण
सहा रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील साखरे बोरगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला व १३ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तर, पाटोदा शहरातील ४० वर्षीय पुरुषाचा आणि वडवणीतील एक ३६ वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com