स्वॅब निगेटीव्ह येऊनही क्वारंटाईन; बीडच्या तरुणाने घेतले कोंडून 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शहरातील आयटीआयच्या इमारती इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन केले जात आहे. शहरातील एक कुटुंब हैदराबादला जाऊन आले. त्यांना क्वारंटाईन केल्यानंतरही या कुटुंबातील काही सदस्यांनी शासकीय कार्यालये, दुकाने तसेच लग्नालाही हजेरी लावली.

बीड : थ्रोट स्वॅब नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल निगेटीव्ह येऊनही इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन सेंटरमधून सोडत नसल्याने एका तरुणाने कोंडून घेत फाशी घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी (ता. २२) दुपारी शहरात घडला. पोलिसांनी समज काढल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा उघडला. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शहरातील आयटीआयच्या इमारती इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन केले जात आहे.

शहरातील एक कुटुंब हैदराबादला जाऊन आले. त्यांना क्वारंटाईन केल्यानंतरही या कुटुंबातील काही सदस्यांनी शासकीय कार्यालये, दुकाने तसेच लग्नालाही हजेरी लावली. त्यामुळे संपर्कातील लोकांना याच ठिकाणी इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील बहुतांश व्यक्तींच्या थ्रोट स्वॅबची तपासणीही झाली आहे. यातील काही लोकांना कोरोनाची बाधाही आढळून आली. दरम्यान, यातील एका तरुणाने स्वॅब अहवाल निगेटीव्ह येऊनही घरी सोडले जात नसल्याचा आरोप करत स्वत:ला इमारतीच्या खोलीत कोंडून घेतले.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

माझे स्वॅब निगेटिव्ह येऊनही मला का घरी जाऊ दिले जात नाही, यापेक्षा मरण परवडलं म्हणत त्याने खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. या सेंटरमधील क्वारंटाईनमधील अन्य लोकांनी आणि तेथील सुरक्षारक्षकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला तिथे पोचले. तेथे सर्वत्र गोंधळ सुरू होता. अन्य लोक ‘तो तरुण फाशी घेईल, त्याला वाचवा,’ म्हणत होते. बिर्ला यांनी संबंधित तरुणाच्या खोलीबाहेर उभे राहून त्याची समजूत काढली. बराच वेळ समजूत काढून त्याला बोलते केले, तेव्हा त्या तरुणाने आपल्या खोलीचे दार उघडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine despite swab negative; The young man from Beed locked himself in the room