रेल्वेचा ब्लॉक, रस्त्याचे काम प्रवाशांच्या मुळावर !

कैलास चव्हाण
बुधवार, 22 जानेवारी 2020

परभणी ते परळी हे अंतर रस्ते मार्गाने ६५ ते ७० किलोमीटर असले तरी परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक ते दीड तासाचा वेळ आणि खड्ड्यांचा त्रास सहन करत प्रवास करण्याची वेळ अनेकांवर येत आहे. 

परभणी : परभणीहून परळी जाणारी अदिलाबाद-परळी ही रेल्वे ७७ दिवसांसाठी परभणीपर्यंतच धावणार असल्याने परभणी येथून गंगाखेड, परळी जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. यातच रस्ते मार्गाने जावे म्हटले तर गंगाखेड-परभणी या मार्गाचे काम आणि खड्डेयुक्त रस्ता यामुळे हा प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे. एकंदरीतच परभणी ते परभणीचा प्रवास प्रवाशांच्या मुळावर उठला आहे.

हेही वाचा - अंगणवाड्यांना मिळणार हक्काची इमारत !

परभणी येथून परळी येथे जाण्यासाठी सकाळी सात वाजता बेंगलोर, आठ वाजता पूर्णा - हैदराबाद या रेल्वे उपलब्ध आहेत. यानंतर दररोज सकाळी साडेदहाच्या सुमारास अदिलाबादहून परळीला जाणारी पॅसेंजर सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवास करण्यासाठी रेल्वे उपलब्ध नसल्याने शेवटची आणि सोयीची रेल्वे म्हणून ओळखली जाते. मात्र, १५ दिवसांपासून परभणी ते परळीमधील गंगाखेड ते पोखर्णी दरम्यान, दररोज सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान, मेगा ब्लॉकच्या कामामुळे सदरील रेल्वे परभणीपर्यंत सोडली जात आहे. ती पुढे अंशत:रद्द करून दुपारी १२.३० वाजता परभणी येथे अकोलाकडे सोडली जात आहे. सकाळच्या दोन रेल्वे गेल्यावर सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्णा-परळी, नांदेड-पंढरपूर या पॅंसेजरची वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. किरकोळ कामांसह दररोज शासकीय कार्यालयात नोकरीसाठी अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची यामुळे गैरसोय होत आहे.

हेही वाचा -  महिनाभरातच हिंगोली-मुंबई बससेवा पडली बंद

२२ मार्चपर्यंत चालणार काम
परभणी ते परळी हे अंतर रस्ते मार्गाने ६५ ते ७० किलोमीटर असले तरी परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक ते दीड तासाचा वेळ आणि खड्ड्यांचा त्रास सहन करत प्रवास करण्याची वेळ अनेकांवर येत आहे. यामुळे रेल्वेने तिकीट कमी असूनही बसचा आर्थिक भूर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या बाबत रेल्वे विभागाने पाच जानेवारी रोजी पत्रक काढून ता. सहा जानेवारी ते ता.२२ मार्चपर्यंत सदरील काम केले जाणार असल्याचे कळविले होते.

प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम 
दुरुस्तीच्या कामासाठी एखाद्या दिवशी दोन ते चार तासांचा ब्लॉक घेणे प्रवाशी सहन करतील. मात्र, दक्षीण मध्य रेल्वे विभागात ७७ दिवसांचा ब्लॉक घेऊन प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. या विभागातील बहुतांष रेल्वे रद्द, अंशत:रद्द करण्याचे काम सध्या सुरु आहे.
- अरुण मेघराज, रेल्वे प्रवासी महासंघ

चांगली सुविधा मिळू शकेल
परभणी ते परळी दरम्यान, पोखर्णी स्थानकापासून रेल्वे रुळाची दुरुस्ती, भुयारी मार्ग व इतर विकास कामे सुरू असल्याने सदरील काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे प्रवाशांना आगामी काळात चांगली सुविधा मिळू शकेल.
- देविदास भिसे, स्टेशन प्रबंधक परभणी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway block, inconvenience of passengers by road work