
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ता. २५ डिसेंबर २०२० रोजी येथील मराठवाडा मेट्रो कोच निर्मितीस सुरुवात करुन या कारखान्याचा लोकार्पण सोहळा करावा अशी विनंती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी या मागणीला तत्वतः मान्यता दिली आहे.
लातूर : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ता. २५ डिसेंबर २०२० रोजी येथील मराठवाडा मेट्रो कोच निर्मितीस सुरुवात करुन या कारखान्याचा लोकार्पण सोहळा करावा अशी विनंती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी या मागणीला तत्वतः मान्यता दिली आहे. कोरोना संकट दूर झाले तर प्रत्यक्ष अन्यथा व्हर्च्युअली या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाईल अशी माहिती औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी रविवारी (ता. ३०) दिली.
ज्येष्ठांना एसटीत बसू द्यावे किंवा नाही ? कोण पडलंय संभ्रमात.
श्री. पवार यांनी रविवारी (ता. ३०) या कारखान्याला भेट देवून पाहणी केली तसेच कामाचा आढावाही घेतला. या कारखाना उभारणीचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मजबुतीकरणासाठी ३ हजार ५०० व संरचनात्मक बांधणीसाठी ६ हजार ८५० मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर ५ लाख ५० हजार बॅग सिमेंट वापरले गेले आहे. याचबरोबर ८६ हजार चौरसफूट रुफशीटचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या कारखाना भेटी दरम्यान निदर्शनास आलेल्या बाबींचा सविस्तर आढावा श्री. गोयल यांना दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील या मुख्य कारखान्याला पुरक व्यवसाय अधिक संख्येने विकसित व्हावे यासाठी लातूर जिल्ह्यातील निवडक उद्योजकांना सोबत घेवून देशातील रायबरेली, वाराणसी व कपूरथला येथील मेट्रो कोच कारखाना व संलग्न उद्योगांचा अभ्यास दौरा केला जाणार आहे. या दौऱ्यातून मुख्य कारखान्याला पूरक उद्योग उभे करून लातूर शहरात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रतिवर्ष २५० बोगीची निर्मिती केली जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसरा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर बोगी निर्मितीची क्षमता ४०० ते ७०० प्रमाणे वाढणार असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, प्रकल्प व्यवस्थापक त्यागी, रेल्वे विभागाचे डेबु, कंत्राटदार संजय माने, नेताजी साठे, अभियंता महेश लेंगरे, शंतनु मुजेंधर उपस्थित होते.
सामंत यांचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही, वाचा कोणी दिला इशारा.
औशाच्या `आयटीआय`मध्ये प्रशिक्षण
या कारखान्यात काम करण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण देणारे ट्रेंड्स औसा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे वाढवून घेतले जाणार आहेत. जेणेकरून या माध्यमातून कारखान्याला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होईल व औसा परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
(संपादन - गणेश पिटेकर)