खरेदी केलेल्या मका, सोयाबीनलाही कोंब 

अरुण ठोंबरे
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

केदारखेडा : व्यापाऱ्यांनाही बसला पावसाचा फटका

केदारखेडा (जि. जालना) - शेतकऱ्यांचे पैसे चुकते करीत खरेदी केलेल्या मका, सोयाबीनचा व्यवहार अनेक व्यापाऱ्यांना अडचणीचा ठरला आहे. खरेदी केलेल्या मका, तसेच सोयाबीनवर परतीच्या पावसाचा मारा झाला. परिणामी कोंब फुटलेल्या या शेतमालाला उकिरड्याचा रस्ता दाखवावा लागला. व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

भोकरदन तालुक्‍यातील केदारखेडा परिसरात यंदा रिमझिम पावसामुळे प्रारंभी हातात आलेल्या मका तसेच सोयाबीनवर ओल होतीच. अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण लक्षात घेता हा शेतमाल मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना विकला. दुष्काळामुळे यंदा बाजारात मोठे आर्थिक व्यवहार झालेले नव्हते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कसाबसा पैसा उभारून शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेतला. अर्थात, हा शेतमाल खरेदी केल्यानंतर वाळविण्यासाठी पसरलेला होता. मात्र, परतीच्या पावसाने मका आणि सोयाबीन अक्षरश: धुऊन काढले. ओल, मॉईश्‍चर कमी होणे दूरच; पण आहे तो शेतमाल भिजून गेला. पावसाने उघडीप न दिल्याने या पिकाला कोंब फुटले. परिणामी लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याने व्यापाऱ्यांवरही या पावसामुळे संकट कोसळले.

खरेदी केलेला मका, सोयाबीन हा शेतमाल व्यापाऱ्यांना उकिरड्यावर फेकावा लागत आहे. दरम्यान, प्रशासनाने पंचनामे करून व्यापाऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. 

सोयाबीन, मका आदी शेतमाल लाखो रुपये देऊन खरेदी केला तेव्हा आकाश निरभ्र होते; मात्र नंतर सतत वीस दिवस सूर्यदर्शन झाले नाही. परिणामी वाळण्यासाठी पसरवूनही शेतमालाची ओल कायमच राहिली. त्यातच परतीच्या पावसाने शेतमालाला कोंब फुटले. सारी मेहनत वाया गेली. खराब झालेला हा शेतमाल उकिरड्यावर फेकावा लागला. लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून व्यापाऱ्यांनाही भरपाई द्यावी. 
- रामेश्‍वर ठोंबरे, 
व्यापारी 
----- 
परतीच्या पावसामुळे खरेदी केलेले सोयाबीन, मका आदी शेतमालाचे मोठे नुकसान झाले. उघड्यावरील शेतमालाला कोंब फुटले. लाखो रुपयांचा शेतमाल खराब झाला. अनेक ठिकाणी व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने व्यापाऱ्यांनाही मदत द्यावी. 
- मधुकरराव तांबडे. 
व्यापारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain badly affected to crops