पिकांची दैना, सर्वच हातचे गेले

बाबासाहेब गोंटे
Thursday, 1 October 2020

यंदा पाऊस पाणी बरा असल्याने शेतकरी, पशुपालक समाधान व आनंद व्यक्त करत होता. मात्र हे जास्त काळ टिकवुन राहिले नाही.

अंबड (जि.जालना) : सततच्या दुष्काळ, भीषण पाणीटंचाई व रोगराई, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. मात्र या वर्षी पावसाळा सुरु झाल्यापासून कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी त्यातच जोराचे वादळ वारे पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा पाऊस पाणी बरा असल्याने शेतकरी, पशुपालक समाधान व आनंद व्यक्त करत होता. मात्र हे जास्त काळ टिकवुन राहिले नाही. खरीपांच्या उत्पन्नातून जगविलेल्या आशा पूर्णपणे फौल ठरल्या आहेत.

साहेब, आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो! एकवीस गावांतील शेतकऱ्यांचा टाहो

उत्पन्न मिळेल, या अपेक्षांने उत्पन्नाचे अंगी बाळगलेले स्वप्न अखेर भंग पावले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची दाणादाण उडाली आहे. सर्वच हातचे गेले आहे. यामुळे शेतकरी आता सरकारला आर्त हाक देत आहे. सरकार मायबाप सरकार खरीपांतील कपाशी, तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद आणि बाजरीसह आदी पिकांची माती झाली आहे. मोसंबी, डाळिंब, पपई, चिकुसह आदी फळबाग तसेच नगदी पिक असणाऱ्या ऊसाची पुरी नासाडी झाली आहे. खरीप पिकांसह फळबागांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊन जगविण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, अशा प्रकारचा टाहो शेतकरी फोडत आहे.

 

शेतकरी गत अनेक वर्षांपासुन अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ त्याच्या पाचवीलाच पुजला आहे. दुष्काळाचे चटके सहन करित असताना कोरोनासारखे जागतिक महामारीचे संकट उभे राहिले आहे. शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सरसकट नुकसान भरपाई द्यावी.
- भाऊसाहेब कनके, शेतकरी

या वर्षी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारने अर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
काशिनाथराव उगले, शेतकरी

 

संपादन- गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Damages Crops Ambad News