चार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, एकशे बासष्ठ जनावरे दगावली

सयाजी शेळके
Tuesday, 27 October 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यात तब्बल चार लाख एक हजार ८८१ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून तब्बल दोन लाख ५९ हजार २५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात तब्बल चार लाख एक हजार ८८१ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून तब्बल दोन लाख ५९ हजार २५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत नुकसानभरपाईची मागणी केली असून येत्या चार ते पाच दिवसांत मदत मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात १३ व १४ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः शेतीसह शेतकऱ्यांचे इतर साहित्य, घरे, जनावरे आदींच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकाने आता रात्री नऊपर्यंत राहणार सुरु, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यामुळे तीन लाख ४४ हजार ६७५ शेतकरी कोरडवाहू क्षेत्र असणार असून त्यांचे दोन लाख २६ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. तर ५० हजार ९७६ बागायती शेतकऱ्यांचे तीन हजार ९५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय फळपिके असणाऱ्या सहा हजार २३० शेतकऱ्यांचे तीन हजार १९३ क्षेत्रांवरील पिकांची नासाडी झाली आहे. दरम्यान कोरडवाहू क्षेत्राला यापूर्वी सहा हजार ८०० रुपयांची नुकसान भरपायी दिली जात होती. या शासनाने प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांची मदत निश्चित केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने वरिष्ठस्तरावर १९९ कोटी ५१ लाख रुपयांची मदत मागितली असली तरी प्रत्यक्षात हा आकडा दोनशे पन्नास कोटीपर्यंत जाऊ शकतो.

१६२ जनावरे दगावली, दोन हजार २३४ घरांचे नुकसान
अतिवृष्टीने काही ठिकाणी जनावरे पुरात वाहून गेली. तर काही ठिकाणी पाण्यात बुडून दगावली आहेत. यामध्ये १०४ मोठी दुधाळ जनावरे दगावली आहेत. तर १९ लहान दुधाळ, २० ओढकाम करणारी मोठी, १९ लहान ओढकाम करणारी अशी जिल्ह्यात एकूण १६२ जनावरे दगावली आहेत. याशिवाय जिल्ह्यात सात घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर दोन हजार २२७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. म्हणजेच जिल्ह्यात एकूण दोन हजार २३४ घरांचे नुकसान झाले आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Hit Above Four Lakhs Farmers, One Hundred Cattles Died Osmanabad News