उकाड्याने त्रस्त लातूरकरांना पावसामुळे दिलासा, आंब्याचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

औसा तालुक्यातील लामजना परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रविवारी (ता. ३१) अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याचे मोठे नुकसान झाले; मात्र गेल्या महिनाभरापासून वाढत्या उकाड्याने त्रस्त लातूरकरांना या पावसामुळे चांगला दिलासा मिळाला. दरम्यान, पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांतील वीजपुरवठा दोन ते अडीच तासांसाठी खंडित झाला होता.

लातूर : औसा तालुक्यातील लामजना परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रविवारी (ता. ३१) अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याचे मोठे नुकसान झाले; मात्र गेल्या महिनाभरापासून वाढत्या उकाड्याने त्रस्त लातूरकरांना या पावसामुळे चांगला दिलासा मिळाला. दरम्यान, पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांतील वीजपुरवठा दोन ते अडीच तासांसाठी खंडित झाला होता. शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढत आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला होता.

वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही-लाही होत होती. असह्य उकाड्याने अनेकांना परेशान केले होते. त्यातच रविवारी सायंकाळी शहरात रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण लातूरकरांना दिलासा मिळाला. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आंबे वादळी वाऱ्यामुळे खाली पडले. टाळेबंदीच्या काळात आंबे विकून चार पैसे कमविण्याचे स्वप्न भंगले, अशा प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे व्यक्त केली. दरम्यान, उजेड, अहमदपूर या भागांतही काही वेळ पाऊस झाला. रविवारी (ता. ३१) सायंकाळी सात वाजता तासभर मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाने शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला.

उंबरठा ओलांडला नाही तरी कोरोनाची लागण, कोरोनाबाधित रुग्णाने मांडली व्यथा

अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू
लातूर  तालुक्यातील चिकलठाणा येथे रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील पवार यांनी दिली. चिकलठाणा येथे रविवारी सायंकाळी मुक्ताबाई बालाजी जाधव (वय ३५) या एका शेतामध्ये खुरपणीचे काम करीत होत्या. यावेळी अंगावर वीज कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी आणण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain In Latur, Ahmadpur Latur News