महत्त्वाची बातमी : पावसाचा मुक्काम वाढणार!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

परभणी कृषी विद्यापीठाचा अंदाज 

परभणी - मराठवाड्यात पुढील तीन दिवस परतीचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

मराठवाड्यात गेल्या वीस दिवसांपासून परतीच्या पावसाने धूमशान सुरू आहे. दसऱ्यानंतर सुरू झालेला पाऊस अजूनही कायम आहे. कुठे ना कुठे रोज धो-धो कोसळणाऱ्या पावसाने जलप्रकल्पातील साठा वाढण्यास मदत होत असली तरी खरिपातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

सोयाबीन, कपाशी आदी पिकांना फटका बसला आहे. रब्बीतील पेरण्या लांबल्या आहेत. आता पुन्हा तीन नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. औरंगाबाद, जालना व हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम तर इतर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता विद्यापीठाने व्यक्त केली आहे. 
 
 

परभणीत मोठे नुकसान
 

पावसामुळे परभणी जिल्ह्यात तीन लाख 23 हजार 783 हेक्‍टरवरील खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने गुरुवारी (ता. 31) नजरअंदाजानुसार जाहीर केले. जिल्ह्यात सोयाबीनची दोन लाख 42 हजार 390 हेक्‍टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी एक लाख 52 हजार 58 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. दोन लाख सहा हजार
975 हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली असून, त्यापैकी एक लाख 53 हजार हेक्‍टरवरील क्षेत्राला फटका बसला आहे.

33 हजार 833 हेक्‍टरवर तुरीची पेरणी झालेली असून, त्यातील पाच हजार 661 तूर बाधित झाली आहे. चार हजार 218 हेक्‍टवर खरीप ज्वारीची पेरणी झालेली आहे. त्यातील एक हजार 814 हेक्‍टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. तर 11 हजार 903 हेक्‍टरवर अन्य पिकांची पेरणी झाली होती. त्यातील सात हजार 310 हेक्‍टर क्षेत्र बाधित आहे.  दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून पीकविमा भरलेल्या पावत्यांसह अर्ज सादर करण्याचा ओघ कायम असून आतापर्यंत 84 हजार 860 शेतकऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे आले आहेत. 
  
 

नांदेडला साडेपाच लाख हेक्‍टरांवरील पिकांची हानी 
 

नांदेड जिल्ह्यात मागील दहा दिवसांत झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने खरिपाचा घास काढून घेतला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाज अहवालात जिल्ह्यातील सात लाख 95 हजार आठशेपैकी पाच लाख 43 हजार 563 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात सर्वाधिक सोयाबीनचे दोन लाख 41 हजार हेक्‍टर तर कपाशीचे एक लाख
17 हजार हेक्‍टरचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 
जिल्ह्यात यंदा सात लाख 58 हजार हेक्‍टरवर अंतिम पेरणी झाली होती. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या तसेच उभे असलेल्या सोयाबीनची मोठी हानी झाली. ज्वारीही काळी पडून नुकसान झाले. 
 
 

हिंगोली जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू 
 

हिंगोली जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, ज्वारी, कापूस आदी पिकांचे प्रशासनाने बुधवारपासून (ता. 30) पंचनामे करण्यास सुरवात केली आहे.  हिंगोली जिल्ह्यात अडीच लाख हेक्‍टरवर सोयाबीनचा पेरा आहे. 40 हजार हेक्‍टरवर कापूस तर 500 हेक्‍टरवर झेंडूची लागवड झाली आहे. सोयाबीनची काढणी सुरू होती, तर झेंडू बहरात होता. दोन्ही नगदी पिके असल्याने दिवाळी साजरी करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. परंतु याच काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीन, कपाशीसह झेंडूचे नुकसान झाले.

उभ्या ज्वारीला कोंब फुटले. दसरा व दिवाळीलाही झेंडू कवडीमोल दराने विक्री करावा लागला. काही शेतकऱ्यांनी तर विक्रीस आणलेला झेंडू बाजारपेठेतच फेकून दिला. बुधवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पाण्याचा वेढा पडलेले व कापून ठेवलेले सोयाबीन इतरत्र ठेवले जात आहे. 
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in next three days