esakal | राजस्थानकडे पायी निघालेल्या कुटुंबाला चारठाण्यात आधार..!
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पोटाची खळगी भरण्यासाठी भिलवाडा (राजस्थान) येथील मजूर वर्ग परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात विहिरींचे खोदकाम करून आपला उदरनिर्वाह भागवित होते. परंतु, अचानक आलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लाॅकडाउन झाल्याने या मजूर वर्गाचे काम बंद झाले. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

राजस्थानकडे पायी निघालेल्या कुटुंबाला चारठाण्यात आधार..!

sakal_logo
By
रंगनाथ गडदे

चारठाणा (जि. परभणी) : कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी, लॉकडाउन करण्यात आल्यामुळे परराज्यातून कामासाठी आलेले कामगार अडकले असून राजस्थानमधील भिलवाडा येथे पायी जाणाऱ्या कामगारांना चारठाणा (ता.जिंतूर, जि. परभणी) येथे प्रशासनाने आधार दिला आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी भिलवाडा (राजस्थान) येथील मजूर वर्ग परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात विहिरींचे खोदकाम करून आपला उदरनिर्वाह भागवित होते. परंतु, अचानक आलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लाॅकडाउन झाल्याने या मजूर वर्गाचे काम बंद झाले. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. कुटुंबप्रमुख  काळूराम भिल यांचे चार पुरुष, दोन महिला व चार मुले असलेले कुटुंब. ते जिंतूरहून आपल्या मूळ गावी भिलवाडा (राजस्थान) कडे जाण्यासाठी पायी निघाले. दरम्यान, सदर कुटुंब जिंतूर-चारठाणा दरम्यान, असलेल्या जोगवाडा पाटी येथे आल्यानंतर चारठाणा येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश राऊत, सय्यद रहेमत अली हे यांना मिळालेल्या माहितीवरून सदर कुटुंबाला त्यांनी जोगवाडा येथे थांबवून विचारपूस केली असता त्यांनी हाताला काम मिळत नसल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने गावी जात असल्याचे सांगितले. 

हेही वाचा व पहा - Video: भाविकांविनाच ‘श्रीराम’जन्मोत्सव


प्रशासनाकडून राहण्याची व जेवणाची व्यवस्था
त्याच दरम्यान, उपविभागीय महसूल अधिकारी उमाकांत पारधी हेदेखील जिंतूरहून सेलूकडे जात होते. रमेश राऊत, सय्यद रहेमत  यांनी त्यांना हा प्रकार सांगितला. तसेच चर्चेअंती सदर कुटुंबीयांना रमेश राऊत यांच्या मालकीच्या चारठाणा टी पाईंटजवळ असलेल्या मयुर हॉटेलवर मंगळवारी (ता. ३१) थांबविण्यात आले. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था रमेश राऊत आणि सय्यद रहेमत अली यांनी केली. दरम्यान ता. एक एप्रिल रोजी जिंतूरचे तहसीलदार सुरेश शेजूळ, चारठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार यांनी मयुर ढाब्यावर भेट  देऊन माहिती घेतली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश राऊत, सय्यद रहेमत, विश्वजित देशपांडे, शेरू पठाण आदींची उपस्थिती होती.प्रशासनाच्या निगराणीत : शेजूळ
चारठाणा येथे ता. एक एप्रिल रोजी जिंतूरचे तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी सदर कुटुंबीयांची  मयुर ढाब्यावर जाऊन भेट घेऊन चर्चा केली. तसेच जिंतूर ग्रामीण रुग्णालयात संबंधित लोकांची तपासणी केली असून सदर कुटुंब प्रशासनाच्या देखरेखीत राहणार आहे. तसेच त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. लाॅकडाउन सुरळीत झाल्यानंतर त्या कुटुंबीयांना मूळ गावी पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.