दानवेंना विश्‍वास : टोपे करतील संधीचे सोने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

समाजाच्या विकासाबरोबर माणसेही जपली म्हणून राजेश टोपे आणि मी सतत निवडून आलो. आरोग्यमंत्रिपदाच्या माध्यमातून जिल्ह्याला विकासाची संधी मिळाली आहे. या संधीचे राजेश टोपे नक्की सोने करतील, असा विश्‍वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. 

जालना - आरोग्यमंत्रिपदाच्या माध्यमातून जिल्ह्याला विकासाची संधी मिळाली आहे. या संधीचे राजेश टोपे नक्की सोने करतील, असा विश्‍वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांचा सोमवारी (ता.13) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वपक्षीय नागरी समितीतर्फे सत्कार करण्यात आला. सर्व पक्षाच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, असा दूर या समारंभात निघाला. कार्यक्रमाला आमदार कैलास गोंरट्याल, नारायण कुचे, सुरेश जेथलिया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, राष्ट्रीवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे, शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, कपिल आकात, मनसेचे गजानन गिते, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख आदींची उपस्थिती होती. 

केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले, की समाजाच्या विकासाबरोबर माणसेही जपली म्हणून राजेश टोपे आणि मी सतत निवडून आलो. विकासावर राजकारण न करता केंद्रस्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेईल, असेही त्यांनी नमूद केले. 

हेही वाचा : नवीन वर्षात तरी बदनापूर बसस्थानक होईल का?

श्री. अंबेकर म्हणाले, की राजेश टोपे यांना राजकीय वारसा मिळालेला आहे, असे असले तरी मिळालेली प्रत्येक जबाबदारी पार पाडीत त्यांनी स्वत:ला सिद्ध केलेले आहे. 

गजानन गिते यांनी ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी; तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य केंद्राची निर्मिती करून रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. 
डॉ. देशमुख म्हणाले, की आरोग्यमंत्रिपद मिळाल्यामुळे जिल्ह्यात दोन मंत्र्यांची ताकद तयार झाली असून जिल्ह्यात चौफेर विकास व्हावा, अशा जनतेच्या अपेक्षा आहेत. 

हेही वाचा : ग्रामीण भागात हुडहुडी...

आमदार गोरंट्याल यांनी शहरातील नर्सिंग कॉलेजमधील जागा वाढवून तांत्रिक परिचरिकांचा कोर्स सुरू करण्याची मागणी केली. 
प्रास्ताविकात राजेंद्र राख यांनी विकासात दुजाभाव न करता संपूर्ण जिल्ह्याला न्याय देण्याची अपेक्षा केली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. संजय काळबंडे यांनी केले. 

सर्वांना सोबत घेऊन 
जिल्ह्याचा विकास : टोपे 

समाजकार्य करण्यासाठी राजकारण हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या माध्यमातून जिळ्ह्यासाठी जे काही करता येईल ते गतीने करणार असून विकासात सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले. आघाडी सरकारच्या काळात विविध विभागांचा मंत्रिपद म्हणून कारभार पाहिला आहे. आता आरोग्यमंत्रिपदावरून सर्वसामांन्याची सेवा करण्यासह येणाऱ्या काळात गरिबांसाठी कार्य करणार आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajesh Tope honoured in Jalna