भाजपकडून लातूरचे रमेश कराडांचा अर्ज दाखल, विधान परिषद निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. असे असताना सोमवारी (ता.११) पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी मुंबईत जाऊन अचानक उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी पक्षातील नेते प्रवीण दरेकर सोबत होते.

लातूर ः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. असे असताना सोमवारी (ता.११) पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी मुंबईत जाऊन अचानक उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी पक्षातील नेते प्रवीण दरेकर सोबत होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे; पण पक्ष त्यांना उमेदवारी देणार का, की डमी म्हणून वापर करणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे कराड हे खंदे समर्थक आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघात कराड यांच्यामुळे पक्ष जिवंत आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळेही त्यांनी निर्माण केले. गेल्या काही वर्षांपासून ते आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत; पण सातत्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दोन निवडणुकींत त्यांचा पराभव झाला. गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता; पण काही कारणामुळे त्यांनी परत घेतला. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपला या निवडणुकीत फायदाही झाली होता.

लोककलावंतांना मदतीसाठी हालचाली, राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार कराड कामालाही लागले होते. गावागावांत संघटन उभे केले होते. त्यामुळे कराड विजयी होतील, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते; पण ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनीच नांगी टाकली आणि पक्षाकडे असलेली ही जागा शिवसेनेला देऊन टाकली. त्यामुळे श्री. कराड नाराज झालेच; पण त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनातून नाराजी व्यक्ती केली. देशमुखांनीच ही जागा मॅनेज केल्याचा आरोप कराडांनी जाहीरपणे केला होता. ही नाराजी आंदोलनापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर विधानसभेच्या निवडणुकीत २५ हजारांपेक्षा जास्त मतदान ‘नोटा’त वळविण्यात ते यशस्वी झाले होते. ताकद असतानाही विधानसभा निवडणुकीत कराड कुठेच दिसले नाहीत. काही महिन्यांपूर्वी त्यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष करून पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

जलस्रोतांच्या क्लोरिनेशनला कोरोनाचा अडसर, वाचा !

गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे. भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. तरीही कराड यांनी मुंबईत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पक्षाचे नेते प्रवीण दरेकर, अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज भरल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने जाहीर केल्यापैकी एखाद्याचा पत्ता काही कारणास्तव कट होईल, तेथे कराड यांची वर्णी लागेल, अशी शक्यता कार्यकर्ते वर्तवीत आहेत. कराड यांना उमेदवारी मिळणार की डमी उमेदवारच राहणार याकडे आता लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Karad File Nomination For Assembly Council Election Latur