रमेश कराडांच्या भाळी आमदारकीचा टीळा, भाजपकडून संघर्षाचे फळ

हरी तुगावकर
Tuesday, 12 May 2020

भारतीय जनता पक्षाचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमदेवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याने श्री.कराड यांचे गेली बारावर्षांपासून पाहत असलेले स्वप्न साकार होणार आहे.

लातूर ः भारतीय जनता पक्षाचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमदेवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याने श्री.कराड यांचे गेली बारावर्षांपासून पाहत असलेले स्वप्न साकार होणार आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघ हा रेणापूर मतदारसंघाचाच एक भाग आहे. रेणापूर मतदारसंघावर पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व राहिले. श्री.कराड हे मुंडे यांचे कट्टर समर्थक. २००९ मध्ये लातूर व रेणापूर मतदारसंघाचे विभाजन होऊन लातूर ग्रामीण मतदारसंघ तयार झाला. मुंडे यांच्या निधनानंतर लातूर ग्रामीणमध्ये पक्ष जिवंत ठेवण्याचे काम श्री.कराड यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा सामना करणे तेवढे सोपे नव्हते. पण श्री.कराड यांनी लातूर ग्रामीणमध्ये एकाकी खिंड लढवली.

ज्वारीमुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस; व्यापारी, ग्रामस्थ करताहेत खरेदी

कराड कुटुंबियांचा वारसा आणि ग्रामीण भागातील संघटनाच्या जोरावर २००९ पासून श्री.कराड हे आमदार होऊन विधीमंडळात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. यातून त्यांनी २००९ ची विधानसभेची निवडणूक लढवली. यात काँग्रेसचे वैजनाथ शिंदे यांनी श्री. कराड यांचा साडेतेवीस हजार मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये काँग्रेसचे ॲड. त्र्यंबक भिसे यांनी श्री.कराड यांचा साडेदहा हजार मतांनी पराभव केला. सलग दोन पराभव होऊनही श्री.कराड यांनी आपली जिद्द सोडली नाही. सातत्याने लोकांशी संपर्कात राहिले. तीन वर्षापूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण रात्रीतून त्यांनी हा अर्ज मागे घेत पंकजा मुंडे गटात परत येत धनंजय मुंडे यांना धक्का दिला होता.

रखरखत्या उन्हात आमदारांची मोटारसायकलस्वारी शेतकऱ्यांच्या बांधावर!!!

२०१९ च्या निवडणुकीत वातावरण चांगले होते. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी कामही सुरु केले होते. पण ऐनवेळी भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली. काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा विजय सुकर व्हावा या करीता पक्षाने ही जागा शिवसेनेला सोडली असा जाहिर आरोपही कराड समर्थकांच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर या निवडणुकीत श्री. कराड फारसे दिसले नाहीत. पण काही महिन्यापूर्वी त्यांना लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद देवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. पक्षाचे कामही त्यांनी सुरु केले होते. दरम्यान सोमवारी (ता. ११) त्यांनी मुंबईत जावून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना पक्ष उमेदवारी देणार की डमी राहणार याकडे लक्ष लागले होते. पण मंगळवारी पक्षाने आधि जाहिर केलेले उमेदवार डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी श्री. कराड यांना अधिकृत उमेदवारी देऊन धक्कातंत्राचा वापर केला. ही निवडणूक बिनविरोध निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे कराडांच्या भाळी आमदारकीचा टीळा लागणार आहे. गेली बारावर्षापासून त्यांचे आमदारकीचे स्वप्न आता साकार होणार आहे. पक्षालाही जिल्ह्यात बळ मिळणार आहे. आतापासूनच त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करू लागले आहेत.

गेली अनेक वर्षापासून मी लातूर जिल्ह्यात काम करीत आहे. पक्ष वाढीसाठी माझा प्रयत्न राहिला आहे. सातत्याने संघर्ष करीत आलो आहे. विधानपरिषदेची उमेदवारी देवून पक्षाने आपल्याला संघर्षाचे फळ दिले आहे.
रमेश कराड, लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष (भाजप)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Karad Get Nomination For Assembly Council Latur