ओळख, प्रेम आणि अत्याचार...असा झाला शेवट (वाचा सविस्तर)

#AurangabadNews
#AurangabadNews


औरंगाबाद :शहरातील 16 वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संशयितास बुधवारी (ता.3) अटक करण्यात आली. दिनेश खरात असे त्या आरोपीचे नाव आहे. 

या प्रकरणी पीडित सावत्र मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. त्यानुसार, 16 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी बाराच्या सुमारास संबंधित मुलगी घरात टीव्ही पाहात होती व तिची आई (फिर्यादी) घरामध्ये काम करत होती. दहा मिनिटानंतर मुलगी घरात नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. शेजारी तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली. दरम्यान, 19 नोव्हेंबर 2019 रोजी 
पीडित मुलीने आपल्या आईसोबत पोलिस ठाण्यात येऊन जबाब दिला. 

ओळख, प्रेम अन्‌ अत्याचार 

पिडीतेच्या जबाबानुसार, तिची आरोपी दिनेशशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती व आरोपी तिच्याशी फोनवर वारंवार संवाद साधून लग्नाचे आमीष दाखवत होता. त्यातूनच त्याने 16 नोव्हेंबर रोजी मुलीला हर्सूल टी पॉईंट येथे बोलावले होते. तिथे मुलगी पोहोचताच त्याने तिला एका पडक्‍या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीला त्याचा मामा भेटला व त्याने दोघांना कन्नडला नेले आणि 18 नोव्हेंबर रोजी आरोपीने मुलीला रात्री साडेआठच्या सुमारास बाबा पेट्रोल पंपाजवळ सोडले. घरच्यांच्या भीतीने मुलगी दिवसभर शहरात फिरत होती आणि रात्री नऊच्या सुमारास घरी पोहोचली, असा जबाब मुलीने दिला. 

शनिवारपर्यंत पोलिस कोठडी 

प्रकरणात पोस्कोसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली. संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, शनिवारपर्यंत (ता.7) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करणे, आरोपीने मुलीला कुठे-कुठे नेले तिथे जाऊन तपास करणे तसेच आरोपीचे कोणी साथीदार आहे का आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com