
माहूर येथील राष्ट्रकुटकालीन पांडव लेणी उत्तराभिमुखी असून एका टेकडीत कोरलेली आहे. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी साधारणपणे सहाव्या ते सातव्या शतकात म्हणजे राष्ट्रकुट काळात कोरली असावी. ही हिंदू लेणी असून संकुलात एकूण चार लेणी आहेत.
नांदेड : साडेतीन पिठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरचे पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. राष्ट्रकुट काळात निर्मिती झालेली प्राचीन पांडव लेणी हा इथला ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र, प्रशासनाच्या बेदखलपणामुळे हा ठेवा अडचणीत सापडला आहे. लेणी परिसरात सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे पर्यटक फिरकत नसल्याचे चित्र असून पुरातत्व विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
माहूर हे नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्रीरेणुका देवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर आदी धार्मिकस्थळेही येथे आहेत. त्याचबरोबर रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत. माहूर येथे रेणुकादेवीचे मुख्य स्थान असल्यामुळे वर्षभर माहूर भक्तांनी गजबजलेले असते. येथे येणारे सर्व भाविक रेणुकादेवीचे, अनुसयामातेचे (दत्तात्रयांची आई) आणि दत्तशिखर येथे दत्तात्रयांचे दर्शन घेऊन निघून जातात. माहूर येथे येणाऱ्या भाविकांपैकी बोटावर मोजता येतील एवढे भाविक माहूरच्या किल्ल्याला किंवा रामगडला भेट देतात. पण माहुर येथे असलेली लेणी पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही पर्यटकांची वाट बघत आहे.
हेही वाचा - Video : बांधकाम व्यावसायिक बियानींचा तीन हजार कुटुंबांस मदतीचा हात
अशी आहे लेणी
माहूरच्या बसस्थानकाजवळ एका टेकडीत ही लेणी कोरलेली आहे. राष्ट्रकूटकालीन या लेण्यात असंख्य खांबांनी युक्त असे १५ मीटर उंचीचे मोठे दालन व त्याला जोडून गर्भगृह कोरले आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेते. खांबावरील शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे आणि एका दालनातील नागराज ही शिल्पे महत्त्वाची आहेत. गाभाऱ्यात सध्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आढळते. या लेण्यांना पांडवलेणी म्हणतात.
माहूर येथील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे
अशी आहे अख्यायिका
भगवान श्रीकृष्णाने पाच पांडवांना माता कुंतीसह श्रीक्षेत्र माहूरला याच पाडव लेणीच्या भुयारी मार्गाने पाठविले. त्यामुळे या लेणीला पांडव लेणी नाव पडले. सदर लेणी १२ जानेवारी १९५३ रोजी औरंगाबाद पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. परंतु, ६७ वर्षाच्या काळात पुरातत्व विभागाकडून या पांडव लेण्याचा कसलाही विकास झाला नसल्याचे दिसते. किंबहुना येथे रस्ता, विद्युत व्यवस्था नसल्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा ठेवा आज विकासापासून दूर राहिला आहे. या लेण्यांच्या संवर्धनाकडे पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी इतिहासप्रेमींकडून होत आहे.