राज्यात तब्बल 28 लाख रेशनकार्ड शांत

विकास गाढवे
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

लाखाच्या पुढे शांत शिधापत्रिका
- वडळा - 162639
- ठाणे - 217616
- पालघर - 182722
- नाशिक - 229838
- जळगाव - 119882
- अहमदनगर - 123550
- पुणे ग्रामीण - 111757
- सोलापूर ग्रामीण - 101867
 

लातूर : राज्यात तब्बल 28 लाख 89 हजार 103 शिधापत्रिका (रेशनकार्ड) शांत आहेत. या रेशनकार्डावर काही महिन्यापासून स्वस्त धान्याची उचल झालेली नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ई - पॉज मशिनने ही माहिती उघड केली आहे. त्यापुढे जाऊन या शिधापत्रिकाधारकांनी अन्य पात्र लाभार्थींची जागा अडवली असून अन्न सुरक्षा योजनेत इच्छा असूनही सरकारला या लाभार्थींना समाविष्ट करता येत नसल्याची स्थिती आहे. यामुळे या रेशनकार्डधारकांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने  निर्णय घ्यावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.

गरजूंना स्वस्त धान्याचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अन्न सुरक्षा योजनेत अंत्योदय योजनेतील लाभार्थीं आणि दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसोबत दारिद्रय रेषेवरील (एपीएल) कुटुंबांचाही समावेश करण्यात आला. या कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदुळ असे धान्य कमी दरात दरमहा देण्यात येत आहे. सरकारने योजनेतील लाभार्थींचे लोकसंख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यानुसार एपीएल कुटुंबांचा योजनेत समावेश करण्यात आला. त्यानंतरही अनेक पात्र लाभार्थी योजनेच्या बाहेर राहिले. या लाभार्थींना योजनेत समाविष्ट करण्यासाठी पूर्वीच्या अपात्र लाभार्थींची संख्या कमी होण्याची गरज आहे. मात्र, वर्षानुवर्षे या अपात्र लाभार्थींच्या नावावर धान्याची उचल सुरू आहे. सरकारने मागील वर्षभरापासून स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचचली आहेत. यातूनच आधार क्रमांकांची नोंद केलेल्या लाभार्थींना ई - पॉज मशिनवरूनच धान्याचे वितरण केले जात आहे.

या योजनेमुळे मंजूर धान्य पात्र लाभार्थींना मिळत असून अपात्र लाभार्थींची संख्याही पुढे आली आहे. यातूनच काही महिन्यापासून धान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकाधारकांचीही संख्याही पुढे आली आहे. राज्यात तब्बल 28 लाख 89 हजार 103 शिधापत्रिकाधारकांनी मागील काही महिन्यात त्यांचे नावे मंजूर असलेल्या धान्याची उचल केलेली नाही. अशा शिधापत्रिका अपात्र समजून त्या रद्द करण्याची गरज आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून काहीच कारवाई होत नसल्याने पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित रहात आहेत. या अपात्र लाभार्थींच्या जागी पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 

लाखाच्या पुढे शांत शिधापत्रिका
- वडळा - 162639
- ठाणे - 217616
- पालघर - 182722
- नाशिक - 229838
- जळगाव - 119882
- अहमदनगर - 123550
- पुणे ग्रामीण - 111757
- सोलापूर ग्रामीण - 101867

मराठवाड्यातील शांत शिधापत्रिका
- औरंगाबाद - 87434
- जालना - 38361
- परभणी - 32400
- हिंगोली - 19763
- बीड - 127273
- लातूर 23281
- नांदेड - 44633
- उस्मानाबाद - 35806


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ration card in maharashtra