Beed : रावणाला सुद्धा शक्तीचा गर्व झाला होता ; पंकजा मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

रावणाला सुद्धा शक्तीचा गर्व झाला होता ; पंकजा मुंडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी : ‘‘काही जण म्हणतात खूप अवघडय, आम्हाला नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार मिळणार नाहीत, हो हे खरंय. कारण, दहशत आणि माफियाराजच तेवढा बोकाळलाय, रावणाला सुद्धा आपल्या शक्तीचा गर्व झाला होता. पण, श्रीरामाच्या वानरसेनेने त्याला पराभूत केलं’’, असा टोला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी लगावला.

त्यांनी कोणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख कोणाकडे, हे स्पष्ट आहे. कारण, आठच दिवसांपूर्वी परळी येथीलच दिवाळी स्नेहमिलनात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आगामी नगर परिषद निवडणुकीत विरोधकांना उमेदवारही मिळणार नाहीत, असे आव्हान दिले होते. रविवारी (ता. १४) पंकजा मुंडे यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेहमिलनात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या टीकेला उत्तर दिले. मला सुद्धा वानर सेना घेऊन लढता येतं. अजून लढाई संपलेली नाही, त्यांना घेऊनच ही लढाई लढायचीय. एकदा बघाच... नीतिमत्ता गहाण ठेवून मी कधी राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. मी असे उमेदवार देईल जे द्वारपाल बनून जनतेची कामं करतील, मतं खरेदी करून त्यांना देशोधडीला लावणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला टीका नाही, कामं करायचीत. परळीकरांनी गोपीनाथराव मुंडेंसारखा लोकनेता देशाला दिलाय, मलाही भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे परळीकरांचा मला अभिमान आहे. माझं ध्येय, माझा कारभार आणि माझे कार्यकर्ते देखील स्वच्छ आहेत. त्यांना ताकद द्यायचीये. परळीत विषाची नाही तर अमृताची वेल लावायचीय, परळीचं नावं खाली जाईल, असं काम माझ्या हातून कदापिही होणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

माजी आमदार आर. टी. देशमुख, आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, फुलचंद कराड, बंकटराव कांदे, दत्ताप्पा इटके, राजेश देशमुख, सतीश मुंडे, अच्युत गंगणे, जुगलकिशोर लोहिया, विनोद सामत, रमेश कराड, माऊली फड, विकासराव डुबे, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, नीळकंठ चाटे, उमा समशेट्टे, शालिनी कराड, दत्ता कुलकर्णी, पवन मुंडे, प्रकाश जोशी आदी उपस्थित होते. शिवाजी गुट्टे यांनी सूत्रसंचालन केले. तर रवी कांदे यांनी आभार मानले.

लढाई जिंकण्यासाठी आशीर्वादाची गरज

''घार उडे आकाशी'' याप्रमाणे माझं परळीवर लक्ष आहे. कुणी म्हणतात मला उचक्या लागतात. पण, आज शेतकऱ्यांना विमा नाही, अनुदान नाही, कोणती कामं होत नाहीत, टोल द्यावे लागतात, त्यामुळे जनतेला मी केलेल्या चांगल्या कामाची आठवण येते. मला विरोधकांवर टीका करायची नाही, त्यासाठी त्या पातळीवर मला जायचं देखील नाही. तुमच्यासाठी मला सतत लढायचंय. मी हरले नाही की खचले नाही, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, आपल्याला पुन्हा कामाला लागायचं आहे. ही लढाई संपलेली नाही. काही लढाया हरू काही जिंकू पण समाजाच्या हिताचे अमृत मिळवण्यासाठी हलाहल पचवावे लागेल, त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

loading image
go to top