चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढीपाडवा... 

टीम ई सकाळ
Friday, 20 March 2020

हिंदू धर्ममान्यतेनुसार वर्षारंभासाठी सर्वांत योग्य दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच मानला गेला आहे. याच दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच वर्षारंभ करण्यामागे काही नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत, असे धर्मविचारकांचे मत आहे. 

हिंदू धर्ममान्यतेनुसार वर्षारंभासाठी सर्वांत योग्य दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच मानला गेला आहे. याच दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच वर्षारंभ करण्यामागे काही नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत, असे धर्मविचारकांचे मत आहे. 

वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस

पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो आणि वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत 'कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे,' असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतेत (10ः35) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक, आल्हाददायक हवा असते.

शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात. हे या दिवशी वर्षारंभ करण्यामागचे नैसर्गिक कारण आहे.

वाली वधाचा आणि राम अयोध्येला परतल्याचा दिवस

रामाने वालीचा वध या दिवशी केला. दृष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले तो हा दिवस. रावण वधानंतर अयोध्येला परतणाऱ्या रामाच्या विजयाचे व आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली जाते. विजयाचे प्रतीक हे उच्च असते. म्हणून गुढी उंच उभी केली जाते.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

शालिवाहन शक सुरू झाल्याचा दिवस

शकांनी हूणांचा पराभव करून विजय मिळविला. तोही याच दिवशी. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले. कारण, या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला. ही याच दिवशी वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.

सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस 

पौराणिक समजुतीनुसार ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरवात झाली. तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. गुढी, म्हणजेच ब्रह्मध्वज घराघरावर उभारतात. त्याची संकल्पपूर्वक पूजा केली जाते.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी निर्माण केली असल्याने या ध्वजाला ब्रह्मध्वज असे धर्मशास्त्राने म्हटले आहे. याला इंद्रध्वज असेही काही जण संबोधतात. हे वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेला करण्याचे सर्वांत महत्त्वाचे व आध्यात्मिक कारण आहे, असे वेदमूर्तींंनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reason To Celebrate Gudhipadwa Hindu New Year In India