Election Results : ...म्हणून खैरेंचा पराभव झाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Results : ...म्हणून खैरेंचा पराभव झाला

गेल्या काही दिवसांपासून आता खैरे नको, अशी शहरवासियांकडून सोशलमिडीयातून झालेली टिका. अगदी काही महिन्यांपासून पक्षापासून दूर गेलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मैदानात घेतलेली उडी खैरेंसाठी सुरवातीपासूनच त्रासदायक ठरली होती. मराठा क्रांती मोर्चाची मुहुर्तमेढ रोखलेल्या या शहरात आम्हाला मराठा उमेदवारच हवा, अशाप्रकारची शिवसैनिक, कॉंग्रेसच्या मतदारांनी ठेवलेली अपेक्षा पक्षनेते, प्रमुखांकडून पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे क्रांतीमोर्चात सातत्याने सहभागी झालेल्या जाधव यांच्यामागे समाज उभा राहीला आणि खैरेंचा पराभव झाला. 

Election Results : ...म्हणून खैरेंचा पराभव झाला

लोकसभा निकाल 2019
औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून आता खैरे नको, अशी शहरवासियांकडून सोशलमिडीयातून झालेली टिका. अगदी काही महिन्यांपासून पक्षापासून दूर गेलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मैदानात घेतलेली उडी खैरेंसाठी सुरवातीपासूनच त्रासदायक ठरली होती. मराठा क्रांती मोर्चाची मुहुर्तमेढ रोखलेल्या या शहरात आम्हाला मराठा उमेदवारच हवा, अशाप्रकारची शिवसैनिक, कॉंग्रेसच्या मतदारांनी ठेवलेली अपेक्षा पक्षनेते, प्रमुखांकडून पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे क्रांतीमोर्चात सातत्याने सहभागी झालेल्या जाधव यांच्यामागे समाज उभा राहीला आणि खैरेंचा पराभव झाला. 

महानगरपालिका ताब्यात, स्वत: 20 वर्षापासून खासदार तरीही औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचा विकासच झाला नाही, अशी टिका श्री. खैरे यांच्यावर सातत्याने करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता उमेदवार बदला नाही तर आम्ही पर्याय निवडू, अशा प्रकारची चर्चा देखील जनता करीत होती. पुन्हा श्री. जाधव यांनी केलेला टोकाच्या विरोधानेच घात केला. खैरेंचा पराभव मीच करेल, असे म्हणत निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतल्यापासून ते पराभवाची बातमी माध्यमांना सांगेपर्यंत जाधव शांत बसले नाही. 

खैरे यांचा पराभव झाल्यानंतर आता मतदार विविध अंगानी चर्चा करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत हर्षवर्धन यांच्या पत्नी संजना जाधव यांना पराभुत करण्यात खैरेच जबाबदार होते, अशी चर्चा रंगते आहे. त्यामुळेच 35 वर्षात एकदाही पराभव न पाहीलेल्या खैरेंना त्यांनी पराभवाची धुळ चारली. जर जाधवांशी वैर घेतले नसते तर त्यांनी लोकसभा लढविलीच नसती आणि खैरेंचा सहज विजय झाला असता, अशा अंगाने चर्चा होत आहे. 

मराठा क्रांतीमोर्चाबद्दलची भूमिकाही नडली 
या निवडणुकीत हिंदूंच्या मतांची श्री. खैरे, श्री. जाधव आणि कॉंग्रेसचे झांबड अशी विभागणी झाली. दुसरीकडे मात्र, एमआयएमचे इम्तियाज यांच्या पाठीशी मुस्लिम, दलित बांधवांनी भक्‍कम साथ दिली. मराठा क्रांती मोर्चाबाबत शिवसेना पक्षाची भूमिका दुटप्पी असल्याची टीका करीत जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे मराठा समाजात त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती होती. शिवाय, मुखपत्रातून क्रांती मोर्चाची केलेली टिंगल यामुळेही समाजातून सातत्याने संताप व्यक्‍त झाला होता. श्री. जाधव रिंगणात नसते तर खैरेंचा सहज विजय झाला असता, असा दावा आता शिवसैनिक करीत आहेत. 

गळाभेट आणि चेहऱ्यावरील हास्य 
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील मतमोजणी केंद्रावर इम्तियाज यांचे गुरुवारी सायंकाळी ऐनवेळी आगमन झाले. ते आत गेल्यानंतर काही वेळाने त्यांच्या विजयाची बातमीच श्री. जाधव यांनी बाहेर येत माध्यमांना दिली. त्यानंतर जाधव यांनी हसत-हसतच मतमोजणी केंद्र सोडले. तत्पूर्वी मी पराभूत झालो तरी इम्तियाज यांच्या रुपाने शहराला सुशिक्षित खासदार मिळाला, असे ते सांगत होते. जाताना हर्षवर्धन, त्यांचे चिरंजीव आदित्यवर्धन यांनी इम्तियाज यांची गळा भेट घेत अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. या तिघांचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

Web Title: Reasons Behind Chandrakant Khaire Defeat Aurangabad Loksabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top